Download App

“आम्ही महाराष्ट्र लुटणाऱ्यांचं, कुटुंब फोडणाऱ्यांचं कौतुक कधीच केलं नाही”, आदित्य ठाकरेंचा पवारांना टोला

महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे आम्ही कधीही कौतुक केले नाही असे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Aditya Thackeray on Sharad Pawar : राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. हा सत्कार ठाकरे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला. खासदार संजय राऊत यांनी काल थेट शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज आमदार आदित्य ठाकरे यांनीही शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे आम्ही कधीही कौतुक केले नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटासह महाविकास आघाडीतील शरद पवार गटावर निशाणा साधला.

ठाकरे पुढे म्हणाले, ज्यांनी महाराष्ट्र लुटला किंवा कुटुंब फोडलं त्यांचं कौतुक आमच्या हातून कधीच होणार नाही. स्वार्थासाठी जे जातात ते जय महाराष्ट्र नाही तर जय गुजरात किंवा जय भाजप म्हणून जात आहेत. कुणी कुणाचं कौतुक करावं हा ज्याचा त्याचा विषय असतो. संजय राऊत यांनी कालच त्यांना उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी फक्त पक्षच फोडला नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरण्याचे पाप केले आहे. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पाठवण्याचे पाप देखील एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांचा सत्कार आणि कौतुक केल्यामुळेच यावर टीका झाली असे आदित्य ठाकरे म्हणाले.

गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का, दिल्लीतील संमेलन दलालांचे.. पवारांची गुगली राऊतांना झोंबली

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकीत एक मोठे साम्य आहे. ते म्हणजे या दोन्हीही निवडणुकांतील विजयी उमेदवारांच्या विजयात निवडणूक आयोगाचा मोठा हात आहे. मतदानात झालेला भ्रष्टाचार लोकांसमोर आणि जगासमोर आणणे गरजेचे आहे. आता आपल्या देशात पारदर्शक आणि निर्दोष निवडणुका होत आहेत का याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे असे आव्हान आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिले.

पवार साहेब राजकारण आम्हालाही कळतं : संजय राऊत

शरद पवार यांचा उल्लेख करत संजय राऊत काल म्हणाले होते की, आपण ज्येष्ठ नेते आहात. आम्ही आपला आदर करतो. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या मदतीने तोडली अशांना आपण सन्मानित करता यामुळे मराठी माणसाच्या मनाला वेदना झाल्या. दिल्लीत तुमचं काय राजकारण आहे ते आम्हाला माहिती नाही पण राजकारण आम्हालाही कळतं. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगू होत असेल पण हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. पण आम्ही मात्र भान राखून पावलं टाकत असतो असा टोला संजय राऊतांनी पवारांना लगावला होता.

follow us