“गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का, दिल्लीतील संमेलन दलालांचे”; पवारांची गुगली राऊतांना झोंबली
![“गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का, दिल्लीतील संमेलन दलालांचे”; पवारांची गुगली राऊतांना झोंबली “गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का, दिल्लीतील संमेलन दलालांचे”; पवारांची गुगली राऊतांना झोंबली](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2024/04/Sanjay-Raut_V_jpg--1280x720-4g.webp)
Sanjay Raut on Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा (Eknath Shinde) केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे. दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन आहे, असा घणाघाती आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली.
पवारांचा गुगली शेजाऱ्याल्याही कळत नाही पण ते माझ्यावर कधीही गुगली टाकत नाही.. एकनाथ शिंदे
शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला. त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले. त्यांनी थेट शरज पवारांवरच निशाणा साधला. राऊत म्हणाले, सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे. कोण कुणाला टोप्या घालत आहे. कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे. कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हीट विकेट होत आहे हे पुन्हा एककदा समजून घ्यावे लागणार आहे.
एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे. आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे. प ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो. ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली. त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली.
पवार साहेब राजकारण आम्हालाही कळतं
शरद पवार यांचा उल्लेख करत राऊत म्हणाले, आपण ज्येष्ठ नेते आहात. आम्ही आपला आदर करतो. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या मदतीने तोडली अशांना आपण सन्मानित करता यामुळे मराठी माणसाच्या मनाला वेदना झाल्या. दिल्लीत तुमचं काय राजकारण आहे ते आम्हाला माहिती नाही पण राजकारण आम्हालाही कळतं. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगू होत असेल पण हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. पण आम्ही मात्र भान राखून पावलं टाकत असतो असा टोला संजय राऊतांनी पवारांना लगावला.
पुण्याचा दादा कोण? पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; चंद्रकांतदादांचंही गुगली उत्तर