भाजपचे ( BJP ) नेते श्रीकांत भारतीय ( Shrikant Bharatiya ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी पहाटेचा देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी हा राष्ट्रपती उठवण्यासाठीची खेळी होती, असे विधान करत गुगली टाकली आहे. या त्यांच्या वक्तव्यावरुन श्रीकांत भारतीय यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. खोटे बोलण्याची परंपरा कुणाची हे महाराष्ट्राला कळाले आहे, अशा शब्दात पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
यावर बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्या संमतीने झाल्याचे म्हटले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या सुसंस्कृत माणुस खोटे बोलेल असे वाटले नव्हते, असे विधान केले होते. आता त्यामागील सत्य स्वत: शरद पवारांनीच सांगितले आहे. पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रपती उठवण्यासाठी केला होता, असे म्हणून शरद पवारांनी सत्य सांगितले आहे. आता महाराष्ट्रातील जनतेला कळेल की खोटे बोलण्याची पंरपरा ही कुणाची आहे, अशा शब्दात श्रीकांत भारतीय यांनी पवारांना लक्ष केले आहे.
तसचे मी सोलापूरच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, महाराष्ट्रातील सामान्य जनतेमध्ये खोटे बोलण्याची पंरपरा कुणाची शरद पवारांची की देवेंद्र फडणवीसांची असा एक सर्वे होऊनच जाऊदा. पण आता शरद पवारांच्या विधानामुळे महाराष्ट्रात खोटे बोलण्याची परंपरा कुणाची आहे, ते स्पष्ट झाले आहे.
तसेच महाराष्ट्राला माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सत्य व स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीविषयी तुम्ही कितीही खोटे बोललात तरी महाराष्ट्राची जनता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळले आहे की, खोटे बोलण्याची परंपरा ही तुमची की देवेंद्र फडणवीसांची, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. दरम्यान शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीवर भाजप नेते सिक्स मारतात की क्लीन बोल्ड होतात, हे येणाऱ्या दिवसांमध्ये कळेलच.