Sonam Wangchuk : लडाखमधील लेह येथे 24 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पर्यावरणवादी (Wangchuk ) सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला होता. वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना वांगचुक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लडाखमधील परिस्थिती आणि नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
वांगचुक यांनी स्वतःच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली. सरकारविरोधात बोलल्यामुळं आपल्याला पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागू शकतं, असा दावा त्यांनी केला. “मला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. आता एन्काउंटरची शक्यताही सांगितली जाते. असं झालं तर होऊ द्या, त्यामुळं देश जागा होईल,” असं वक्तव्य त्यांनी केलं.
Sonam Wangchuk : केंद्र सरकारशी डील केली? स्पष्टीकरण देत सोनम वांगचुक ट्रोलर्सवर संतापले
लेहमधील गेल्या वर्षीच्या हिंसाचारामागचं सत्य समोर आणण्यासाठी न्यायालयीन चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही वांगचुक यांनी केली. हा अहवाल जाहीर न झाल्यास स्वतंत्र ‘पीपल्स ट्रिब्युनल’ स्थापन करून घटनेची चौकशी करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गेल्या वर्षी लडाखला राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या Sixth Schedule अंतर्गत संरक्षण मिळावं, या मागण्यांसाठी आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर परिस्थिती चिघळली होती.
दरम्यान, हिंसाचाराच्या वर्षपूर्तीनिमित्त लेहसह लडाखच्या विविध भागांत बंद पाळण्यात आला आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वांगचुक यांनी या घटनेला कट असल्याचा दावा करत त्यामागील सत्य लोकांसमोर येण्याची गरज व्यक्त केली. मात्र, त्यांच्या काही आरोपांवर लडाख पोलिसांनी आक्षेप घेत ते निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, श्रद्धांजली कार्यक्रमासाठी कोणालाही रोखण्यात आलं नव्हतं आणि सुरक्षेची व्यवस्था ही नियमित प्रक्रियेचा भाग होती.
