Supriya Sule Chief Minister Speculation: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष NDA मध्ये सहभागी होणार आणि त्याबदल्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं, अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. मात्र, सुप्रिया सुळे यांनी याआधीच या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्या शपथविधीला आपण उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच, केवळ 10 आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देत असेल, तर तो एक विक्रम ठरेल, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला होता.
संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी कोणाची लेक आहे, हे विसरू नका. मी वास्तवात जगते,’ अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या वक्तव्याला उत्तर दिलं. तसेच, मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक नंबर महत्त्वाचा असतो, असं सांगत त्यांनी अजित पवार यांच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली.
‘अजित पवार यांची 40 वर्षांपूर्वीची विधाने ऐका. ज्यांच्याकडे मॅजिक नंबर असतो, तोच मुख्यमंत्री बनू शकतो. कोणी तरी बालिशपणे लिहित असेल, तर त्यावर मी काही बोलणं क्रमप्राप्त नाही. मी गंभीर राजकारणी आहे. त्यासाठीच बारामतीच्या मतदारांनी मला निवडून दिलं आहे,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Mandar Kiwale : माझ्याकडे पाहा, तू वाचणार… मदतीसाठी मंदारकडे धावलेल्या महिला वकिलाने सांगितला थरार…
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण वास्तवात जगत असल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत केवळ राजकीय विधानांपेक्षा सभागृहातील संख्याबळ महत्त्वाचं असल्याचा संदेशही त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आला.
