Sushma Andhare : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना मध्य प्रदेशमधील भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. पण त्यानंतर ते बेपत्ताच होते. अखेर ऐन दिवाळीत पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करत त्यांना भोपाळमधून अटक केली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना भोपाळमधून अटक; बेपत्ता असल्याने लोकेशन ट्रेस करुन कारवाई
ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावरील कारवाईचा अंधारे यांनी निषेध करत भाजपाला फैलावर घेतले. अंधारे म्हणाल्या, अद्वय हिरे यांनी अगदी आज या क्षणाला जरी म्हटलं की मी शिवसेना सोडून भाजपसोबत यायला तयार आहे तर त्यांच्यावरील सगळ्या कारवाया जागच्या जागी थांबतील. याशिवाय 70 हजार कोटींचा घोटाळा नजरेआड होऊ शकतो. प्रसाद लाड यांना क्लीनचीट मिळू शकते. मोहित कंबोजच्या शेकडो बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीनचीट देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. साडेसात कोटींच्या अनियमिततेपेक्षाही मोठा अपराध काय तर ते (अद्वय हिरे) भाजपाच्या विरोधात उभे आहेत, असे अंधारे म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?
दशकभरापूर्वी मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी नाशिक जिल्हा बँकेने साडे सात कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. अद्वय हिरे बँकेचे संचालक असतानाच हे कर्ज मंजूर झाले होते. याप्रकरणी बँकेकडून वसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या काळात कर्जाची रक्कम 32 कोटी रुपयांपर्यंत पोहचली. शिवाय कर्ज घेताना बोगस कागदपत्र घेतल्याचाही आरोप करण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणानंतर हिरे यांच्याविरोधात मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.
Sushma Andhare : ‘मराठा-ओबीसी वादाचा भाजपाचा डाव’ सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
अद्वय हिरे यांना अटक झाल्यानंतर डॉ.अपूर्व प्रशांत हिरे यांनी राजकीय कारवाई असल्याचे म्हंटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून या कारवाईचा निषेध केला जात आहे. यावर आता सत्ताधारी गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.