प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आणि सरकारच्या अपयशाचा पाढा एका पत्राद्वारे मांडला. आज झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नव्हता पण एकेकाळी विरोधी पक्षनेते असलेल्या सहा नेत्यांनी चहाचा भुरका एकत्रित घेतला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचे चहापान ऐतिहासिक ठरले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पावसाळी अधिवेशनाचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. शिंदे-फडणवीस सरकारमधील अजित पवार यांच्या एन्ट्रीनंतरचा हा पहिलाच चहापान कार्यक्रम होता. हा कार्यक्रम सत्ताधारी पक्षाचा असला तरी बघणाऱ्याला माजी विरोधी पक्षनेत्यांचे चहापान आहे का? असे वाटत होते. याचे कारण म्हणजे एकेकाळी महारष्ट्राच्या विधीमंडळात विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेत असलेल्या सहा नेत्यांची उपस्थिती.
फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असलेले एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे तर महाआघाडीच्या काळात विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार असे सहा माजी विरोधी पक्षनेते एकच सरकारमध्ये सहभागी होऊन चहाचा भुरका घेत होते म्हणजेच सत्तेचा गोडवा चाखत होते.
विरोधी पक्ष गोंधळलेल्या आणि अवसान गमावलेल्या अवस्थेत; CM शिंदेची खोचक टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली तेव्हा एकेकाळचे चार माजी विरोधी पक्षनेते एकाचा व्यासपीठावर बसून राज्याच्या विकासावर बोलत होते. या सर्वांनी कधीकाळी चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालून एकमेकांविरोधात दंड थोपटले होते. राज्याचा कसा बाट्याबोळ झालाय हे तावातावाने मांडत होते. ते सर्व विरोधी पक्षनेते आज सरकारच्या कल्याणकारी योजना पोटतिडकीने मांडत होते आणि एकमेकांचे कौतुक करत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विरोधी पक्षांनी चहापानाच्या कार्यक्रमावर टाकलेल्या बहिष्काराची खिल्ली उडवत होते.
घटनाबाह्य आणि कलंकित सरकारबरोबर चहापान घेणार नाही, विरोधी पक्षांचा बहिष्कार
विरोधी पक्ष कमजोर असला तरी आम्ही त्यांचा सन्मान करू, असं मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या भाषणात सांगितले. सध्याचा विरोधीपक्ष दुबळा आहे याची मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पुन्हा आठवण करुन दिली. कदाचित सहा माजी विरोधी पक्षनेत्यांना एकाच सरकारमध्ये सहभागी करुन घेत आम्ही विरोधक कमजोर केलंत असं तर मुख्यमंत्र्यांना सुचवायचे नव्हते ना? असा प्रश्न उपस्थित होतो.