घटनाबाह्य आणि कलंकित सरकारबरोबर चहापान घेणार नाही, विरोधी पक्षांचा बहिष्कार
Maharashtra Monsoon Session 2023 : राज्याच्या विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चहापान कार्यक्रमास उपस्थित राहून राज्यासमोरील प्रश्नांबाबत विचारविमर्श करण्यास आम्हाला निश्चितंच आवडले असते. परंतु, गत वर्षभरात राज्यात आणि देशात लोकशाही शिल्लक उरली नसल्याचे भेसूर चित्र समोर येत आहे, असा हल्लाबोल त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.
ते म्हणाले की विविध राजकीय पक्ष फोडून पक्षच पळवून नेण्याचे सुरु असलेले राजकारण पहाता राज्यात लोकशाहीची हत्याच केलेली आहे, संविधान टिकविण्याची जबाबदारी असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्य व कार्यकर्त्यांवर दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी शासकीय स्वायत्त संस्थाचा होत असलेला गैरवापर, विरोधी पक्षातील नेत्यांवर जाणीवपुर्वक दाखल केलेले खोटे गुन्हे, राजकीय हेतूसाठी तपास यंत्रणांमार्फत होत असलेल्या कारवाया, या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करुन आपल्यासोबत येण्यास भाग पाडायचे, जे येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायची, येतील त्यांना संरक्षण द्यायचे, ज्यांच्यावर आरोप केले ते सोबत आल्यानंतर त्यांना निर्दोषत्वाचं सर्टीफिकेट देऊन अभय देणे, हे सारं लोकशाहीसाठी मारक आणि संविधानविरोधी आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
भाजपविरोधात ‘आप’ला कॉंग्रेसचा हात; केंद्र सरकारच्या त्या अध्यादेशाला दर्शवला विरोध
वर्षापासून सत्तेवर असलेल्या तुमच्या सरकारला लोकमान्यता नाहीच पण संविधानाचीही मान्यता नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही सदस्यांचा मंत्रीमंडळामध्ये केलेला समावेश देखील घटनाबाह्यच आहे. आपल्या सरकारमधील मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री महोदयांसहीत मंत्री, आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असून घटनाबाह्य सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
ते पुढं म्हणाले की राज्यात अद्याप पूर्ण मंत्रिमंडळ देऊ शकला नाही. सत्तारुढ मंत्री, आमदार, नेते नवनवीन वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबतच नाही. तसेच आपल्या सरकारमधील मंत्र्यांबाबत भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे देऊन देखील त्यांचेवर कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांचा मुजोरपणा वाढला आहे.
अजित पवार गटाने घेतली पवारांची भेट, NCP मधील हालचालींविषयी फडणवीस काय म्हणाले?
गेल्या वर्षभरात ज्या वेगाने निष्ठा बदलली. त्याचा राग लाखो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असतानाच वांद्रे (पुर्व) येथील शिवसेना पक्षाच्या शाखेवर बुलडोजर चालवून व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा चालवून आपली पक्ष निष्ठा वेशीला टांगली आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.
स्वविचाराने निर्णय घेण्याचा, निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार नसलेल्या, सर्वोच्च न्यायालयाने गटनेता म्हणून नाकरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या घटनाबाह्य व कलंकित असलेल्या सरकार बरोबर चहापान घेण्यास स्वारस्य नाही, असा जोरदार हल्लाबोल अंबादास दानवे यांनी केली.