शरद पवारांनी भाकरी फिरवली! पक्षात केला मोठा फेरबदल; 10 नव्या प्रवक्त्यांची घोषणा

यापूर्वी पक्षाने केलेल्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या 4 ऑगस्ट 2026 रोजी रद्द केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा निर्णय झाला.

News Photo   2026 08 29T174411.681

शरद पवारांनी भाकरी फरवली! पक्षात केला मोठा फेरबदल; 10 नव्या प्रवक्त्यांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP) संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेत नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. पक्षाकडून एकूण 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली असून राज्यासह राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे आणि इतर नेत्यांचा या यादीत समावेश आहे

पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, फौजियाताई खान, राजेंद्रजी शिंगणे आणि माजी आमदार ॲड अशोकबापू पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतरच नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

2014 मध्येच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारचा प्रस्ताव; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

नव्या यादीत जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, ॲड फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, ॲड. हेमाताई पिंपळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे. त्यामुळं आगामी काळात विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासोबतच विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी या प्रवक्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, यापूर्वी पक्षाने केलेल्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या 4 ऑगस्ट 2026 रोजी रद्द केल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वाक्षरीच्या पत्राद्वारे यासंदर्भातील माहिती देण्यात आली होती. त्यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर भूमिका मांडतील, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पक्षाने नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातील रणनीतीत महत्त्वाचा बदल झाल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version