तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या… तुम्हाला पुरून उरणार; लंकेंचा विखेंवर निशाणा

Nilesh Lanke: या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे राजकारण चुकीच्या पद्धतीने कोणी दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Nilesh Lanke

Nilesh Lanke On Sujay Vikhe : सत्ता आपल्या हातात आहे किंवा नाही, यापेक्षा जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. सत्ता नसतानाही पिंपळगाव रोठा येथे अशोक घुले यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची आपली भूमिका आहे. राजकारणात स्पर्धा करायची असेल तर ती विकासाची करा; विरोधकांना अडचणीत आणणे, पोलिसांवर दबाव आणणे किंवा खोटे गुन्हे दाखल करणे, अशा राजकारणाला आपण कधीही महत्त्व दिले नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो आणि सत्याचा विजय अंतिम असतो, असे प्रतिपादन खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केले.

पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री कोरठण खंडोबा देवस्थान परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर होते. यावेळी लंके यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेशी जोडलेले राजकारण आणि तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत विरोधकांवर नाव न घेता जोरदार शरसंधान साधले.

अशोक घुले हे प्रामाणिकपणे काम करणारे नेतृत्व आहे. सत्ता आपली नसतानाही त्यांनी गावातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लावली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मी न्याय देणार आहे, असे लंके यांनी सांगितले. आपल्या गटातील सर्वच सरपंचांनी आपापल्या गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली असल्याचे सांगत लंके म्हणाले, सत्तेचा फायदा लोकांना करून देता आला पाहिजे. सत्ता ही जनतेच्या विकासासाठी असते. सत्तेचा उपयोग विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी किंवा राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी करण्यापेक्षा गावांचा विकास, नागरिकांच्या समस्या आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले पाहिजे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर मैदानात येण्याचे आव्हान दिले. “माझे नेहमी सांगणे असते की स्पर्धा करा; पण स्पर्धा कशाची करा, तर विकासाची स्पर्धा करा. कोणत्या गावात किती विकासकामे झाली, किती निधी आणला आणि जनतेच्या किती समस्या सोडवल्या, यावर स्पर्धा झाली पाहिजे. मात्र सध्याच्या राजकारणामध्ये समोरच्याला कसे अडचणीत आणता येईल, कसे खिंडीत पकडता येईल आणि खोटे गुन्हे कसे दाखल करता येतील, याचे राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सध्या सत्तेचा वापर कुठे चालू आहे, तर पोलिसांवर दबाव आणायचा, खोटे गुन्हे दाखल करायचे. अशा गोष्टींना मी कधीही महत्त्व दिले नाही. मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे. शेवटी सत्याचा विजय होतो आणि सत्याचा विजय अंतिम असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.


निलेश लंके जिल्हा बँकेत जात असतो. कोणतीही बाह्यशक्ती येऊ द्या

नीलेश लंके यांचे तालुक्याकडे लक्ष नाही, असे काही जण म्हणत असल्याचा उल्लेख करत त्यांनी जिल्हा बँकेच्या ठरावाच्या वेळी आपली भूमिका स्पष्ट झाल्याचे सांगितले. जिल्हा बँकेच्या निवडणुका आता जाहीर होत असून कोणतीही बाह्यशक्ती अथवा आंतरशक्ती समोर आली तरी आपण पुरून उरणार असल्याचा दावा त्यांनी केला. बँकेच्या निवडणुका आता जाहीर होत आहेत. आता कोणी कितीही काही करू द्या. निलेश लंके जिल्हा बँकेत जात असतो. कोणतीही बाह्यशक्ती येऊ द्या किंवा आंतरशक्ती येऊ द्या. तुम्ही कितीही अंत पाहण्याचा प्रयत्न करा; परंतु तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार आहे. तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या; परंतु तुमचा राजकारणात शेवट केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे खंडेरायाच्या चरणी सांगतो, असे आक्रमक विधान त्यांनी केले.

तुमच्या विरोधात माझी कुठेही दंड थोपटण्याची तयारी-निलेश लंके
माझ्या तालुक्यात येऊन दररोज आढावा बैठका घ्या किंवा पत्रकार परिषद घ्या, त्याने फरक पडत नाही, असे सांगत लंके यांनी विरोधकांवर टीका केली. “तुम्ही आढावा बैठका घेता आणि त्यामध्ये माझ्यावर टीका करता. राजकारणासाठी माझ्या विरोधात महिलांना पुढे करता. एआय फोटो तयार करता. मात्र तुमच्या विरोधात माझी कुठेही दंड थोपटण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले. तालुक्यातीलच काही लोकांना पुढे करून विकासकामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे राजकारण चुकीच्या पद्धतीने कोणी दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. काचेच्या घरात राहणारे मी दुसऱ्याच्या घरावर कधीही दगड मारायचा नाही. मात्र जनतेच्या विकासाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर त्याला विरोध करण्याची आपली तयारी आहे, असे लंके यांनी सांगितले. तालुक्यात येणाऱ्या बाह्यशक्तींना रोखण्याची गरज व्यक्त करताना ते म्हणाले, हा तालुका पुरोगामी विचारांचा तालुका आहे. तालुक्यात येत असलेल्या बाह्यशक्तींना रोखण्याचे काम आपण केले पाहिजे. येथील राजकारण स्थानिक जनतेच्या प्रश्नांभोवती आणि विकासाच्या मुद्द्यांभोवतीच झाले पाहिजे. सत्ता असो अथवा नसो, जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले. विकासकामांमुळे पिंपळगाव रोठा आणि श्री कोरठण खंडोबा देवस्थान परिसराच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

follow us