मुंबई : काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही, असा दावा करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपच (bjp) पक्षाला बदनाम करत असल्याचा आरोप केला. विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या राजीनाम्याविषयी नाना पटोले यांनी कानावर हात ठेवले. राज्याचे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला नाना पटोले हजर राहणार नाहीत. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आपण असणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले असा संघर्ष सुरू झाला. पटोले यांच्या कार्यपद्धतीवर आणि घेतलेल्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त करत थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. पक्षातील गटबाजी उघड झाली. त्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली असून नेत्यांमधील हा वाद मिटविण्यासाठी रविवारी प्रभारी एच. के. पाटील मुंबईत राहणार आहेत. पाटील थोरात व इतर नेत्यांशी चर्चा करणार आहेत. याबरोबरच प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. परंतु नाना पटोले बैठकांना उपस्थित राहणार नाहीत. या संदर्भात प्रभारींशी आपले सविस्तर बोलणे झाले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत वाद चव्हाटय़ावर आला होता. परंतु नाना पटोले यांनी त्याविषयी विचारलं असता कानावर हात ठेवले. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे की नाही हे मला माहीत नाही, त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही, असे ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरातच मुंबईचा दोन वेळेस दौरा केला, याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीशिवाय मोदींना मुंबई, महाराष्ट्राची आठवण होत नाही. जानेवारीत मेट्रोचे उद्घाटन आणि आता वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ निमित्त आहे, असे नाना पटोले म्हणाले.