Download App

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे भाजपला पाठिंबा देणार; आशिष देशमुखांचं मोठं विधान

Uddhav Thackeray and Eknath Shinde will come together, claims Ashish Deshmukh : काँग्रेसमधून (Congress) निलंबित करण्यात आलेले आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तेव्हापासून आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा आशिष देशमुख चर्चेत आले. त्यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाविषयी मोठं वक्तव्य केलं. ठाकरे आणि शिंदे हे एकत्र येणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यातील संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांचे काय होणार याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. याविषयी बोलतांना कॉंग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना अपात्रतेची वेळ येऊनच देणार नाहीत. कारण, ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार आहेत. परिणामी, महाविकास आघाडी तुटेल आणि त्यानंतर दोन्ही गट भाजपला पाठिंबा देतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अपात्रतेची ही कारवाई सहा वर्षांसाठी असेल. आमदार अपात्र झालेच तर अनेकजण राजकारणातून आऊट होतील, असं देशमुख यांनी सांगितलं.

‘The Kerala Story’ वरून सुरू असलेल्या वादावर कंगना रनौत पुन्हा उचकली; म्हणाली, “असे चित्रपट…”

कोणताही नेता किंवा पक्ष आपल्या आमदारांना अपात्र ठरतांना पाहणार नाही. त्यामुळे भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील. अपात्रते विषयीचे तांत्रिक मुद्दे पाहिले असता कुणालाही राजकारणातून बाद व्हायला आवडणार नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते एकत्र आले तर कुणालाही अपात्र होण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत दोन्ही शिवसेना एकत्र येणे हाच एकमेव मार्ग उरला आहे, असेही ते म्हणाले.

त्यामुळे सध्या महाविकास आघाडी जो काही जागावाटपाची वाटघाटी चालली आहे, त्याला अर्थ नाही. दोन्ही नेते एकत्र येणार असून शिवसेना भाजपसोबत जाणार असल्याचा मोठा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते मविआमध्ये एकवाक्यता नाही, त्यामुळं महाविकास आघाडी फुटणार, असा दावा करत होते. आणि आता देशमुख यांनी मविआ तुटणार असं भाकीत केलं. त्यामुळं त्यांच्या दावा कितपत खरा ठरतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us