आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या दौऱ्याची सुरुवातच शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यातून केली आहे. या दौऱ्यात ठाकरे पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दौऱ्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
पक्षात पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बंजारा समाज बांधवांचं आराध्य दैवत पोहरादेवी मंदिरामध्ये जात दर्शन घेणार आहेत. यावेळी बंजारा समाजाकडून उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागतही करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. त्यानंतर उद्धव ठाकरे अमरावतीकडे रवाना होणार आहेत.
‘आधीच योग्य वागले असते, तर ही वेळ आली नसती’; अजित पवार गटातील नेत्यानं आव्हाडांना सुनावलं
उद्धव ठाकरे यांचा हा दोन दिवसीय विदर्भ दौरा असणार आहे. एकीकडे राज्यात राजकीय उलपालथ झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाची काय भूमिका असणार आहे, याबाबत उद्धव ठाकरे बोलणार असल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, पक्षात पडलेली उभी फुट आणि मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरादेवीत येणार आहेत. पक्षातील फुटीनंतर शिंदे गटात गेलेले संजय राठोड आणि भावना गवळींच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार आहे. संजय राठोड हे बंजारा समाजाचे बडे नेते आहे. राठोडांनी साथ सोडून शिंदे गटात गेल्याने आता ठाकरे गटातून बंजारा समाजाचा नवा चेहरा कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.