Umesh Patil On Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) माझ्यामुळे दौरा रद्द केला, असे मी कुठेही बोललो नाही. मी जर तसं बोललो असं मला दाखवून दिलंत, तर मी सार्वजनिक जीवनातून आणि राजकारणातून निवृत्ती घेईन, असं विधान अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केलं.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही राज्यभर जनसन्मान यात्रा काढली. आज मोहोळच्या सभेआधीच राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली. दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही असे म्हणत अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक दिली होती. यावरून अजितदादांनी पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार म्हणाले, कुत्रे गाडी खाली जाते, तसे त्याला वाटतं तोच गाडी चालवते. कोणीतरी पठ्ठ्या म्हणाला, दादाचा दौरा मी रद्द केला. पण अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असं म्हणत त्यांनी उमेश पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. पुढं ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक दौऱ्यावर आल्याने मी मोहोळ दौरा रद्द केला होता, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.
…तर राजकारणातून निवृत्ती घेईन – पाटील
दरम्यान, अजित पवारांच्या टीकेवर बोलतांना पाटील म्हणाले, अजित पवारांनी माझ्यामुळे दौरा रद्द केला, असे मी कुठेही बोललो नाही. मी जर तसं बोललो असं मला दाखवून दिलंत, तर मी सार्वजनिक जीवनातून आणि राजकारणातून निवृत्ती घेईन, असं उमेश पाटील म्हणाले. तसेच आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांनी अजित पवार यांनी चुकीच्या पद्धतीने अजित पवारांचे जाऊन कान भरले. अजित पवारांचा स्वभाव मला त्यांच्यापेक्षा जास्त माहीत आहे, असं पाटील म्हणाले.
अजितदादा माझे नेते…
पुढं ते म्हणाले, अजित पवार कालही माझे नेते होते, आजही माझे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर मला काही बोलायचं नाही. मात्र, सत्ता नसती तर यशवंत माने, राजन पाटील हे तुमच्यासोबत आले असते का? सत्ता नसतांना उमेश पाटील तुमच्यासोबत आला असता का? या प्रश्नाचे उत्तर एकच आहे. सत्ता नसती तरी उमेश पाटील तुमच्यासोबत आला असता. पण, राजन पाटील आणि यशवंत माने तुमच्यासोबत आले नसते, हे अजितदादांनाही माहित आहे,असं उमेश पाटील म्हणाले.
यशवंत मानेंनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे उमेश पाटील यांची तक्रार केल्यानंतर तटकरेंनी उमेश पाटलांना इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल, त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम पक्ष नक्की करेल, असं तटकरे म्हणाले. यावरही पाटील यांनी भाष्य केलं.
ते म्हणाले की, सुनील तटकरे यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार आहे. मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की जी कारवाई केली जाईल ती सिलेक्टिव्ह कारवाई नको. कारण, राजन पाटील यांनी कोणत्याही प्रकारची पार्लंमेंटरी बोर्डाची बैठक झाली नसतांना देखील परस्पर मोहोळ विधानसभेचा उमेदवार कसा जाहीर केला? त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हायला नको का? तसेच यशवंत माने हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना सोबत घेऊन अजित पवारांनी दिलेल्या निधीच्या कार्यक्रमांची उद्घाटनं करतात, हे पक्षशिस्तित मोडणारं आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.