आधी हल्लाबोल, नंतर थेट शरणागती….शिवतारेंची विश्वासर्हता वाऱ्यावर!

Vijay Shivtare U turn राजकारणात विरोधकांवर हल्ला करताना इतकेही पुढे जाऊ नये की तेथून इंचभर सुद्धा मागे फिरणे मुश्किल व्हावे, असा वडिलकीचा सल्ला अनेक ज्येष्ठ राजकारणी देतात. राजकारण हे नेहमीच तडजोडींचे असते. पण ती तडजोड विश्वासार्ह वाटणे तितकेच महत्वाचे. तडजोड केल्यानंतर आपलाच मोहरा त्यात बळी जायला नको, ही एक खबरदारी घ्यावी लागते. असाच अनुभव पुरंदरचे […]

Ajit Pawar, Vijay Shivtare

Ajit Pawar, Vijay Shivtare

Vijay Shivtare U turn राजकारणात विरोधकांवर हल्ला करताना इतकेही पुढे जाऊ नये की तेथून इंचभर सुद्धा मागे फिरणे मुश्किल व्हावे, असा वडिलकीचा सल्ला अनेक ज्येष्ठ राजकारणी देतात. राजकारण हे नेहमीच तडजोडींचे असते. पण ती तडजोड विश्वासार्ह वाटणे तितकेच महत्वाचे. तडजोड केल्यानंतर आपलाच मोहरा त्यात बळी जायला नको, ही एक खबरदारी घ्यावी लागते. असाच अनुभव पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांना येत असावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्ला चढविताना ते इतके आक्रमक झाले की जणू काही अजितदादा हे आपल्याचा पक्षाची सत्ता असलेल्या महायुतीच एक भागीदार आहेत, याचा त्यांना विसर पडला. जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने १२ एप्रिल रोजी बारा वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरणारच अशी गर्जना केली. पण शिवतारे यांचे सारे बोलणे हा फुकटचा बार ठऱला. कठोर हल्लाबोल केलेल्या शिवतारेंनी सपशेल शरणागती पत्करली. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि महायुती मजबूत करण्यासाठीचे कारण दिले. पण अजित पवारांच्या विरोधात वक्तव्ये करताना ही साधी गोष्ट त्यांना माहीत नव्हती का, असा बाळबोध प्रश्न उपस्थित होतो. पण शिवतारे यांची ही शरणागतीची वृत्ती त्यांची विश्वासर्हता संपविणार का या प्रश्नाचे उत्तर या निमित्ताने शोधू. (Vijay Shivtare Vs Ajit Pawar)

मोठी बातमी : अजितदादांचं टेन्शन संपलं; शिवतारेंची बारामती मतदारसंघातून माघार

बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार कुटुंबाची सद्दी संपविण्याचा विड शिवतारे यांनी उचलला होता. पण २८ मार्चच्या रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल माघार निश्चित केली. नंतर त्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

शिवतारे यांचा अजित पवारांच्या विरोधात स्फोट होण्याला एक साधे कारण निमित्त ठरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बारामतीच्या दौऱ्यावर येणार होते. तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन शिवतारे हे बारामतीच्या विमानतळावर गेले होते. त्यावेळी अजित पवारही शिंदे आणि फडवणिसांच्या स्वागतासाठी  तेथे आधीच उपस्थित होते. शिवतारे यांनी त्यावेळी अजित पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवारांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. तेथेच शिवतारे यांची सटकली. अजित पवारांची गुर्मी त्यांच्या डोक्यात बसली. त्यानंतरच ते आक्रमक झाले. हा प्रसंग स्वतः शिवतारे यांनी अनेकदा सांगितला.

शिवतारे यांच्या रागाला हा प्रसंग पुरेसा होता. मग शिवतारेंनी रानच पेटविले. जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने ‘एल्गार’ पुकारला. पुढे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषद गाजू लागल्या. आरोप, टीका-टिप्पणी ते करू लागले. ‘काहीही झालं तरी आता माघार नाही’, ‘बारामती कोणाची जाहागिरी नाही’ यासह त्यांची अनेक विधाने गाजली. तुम्हाला समर्थक मिळाले. माय-बाप जनता, पदाधिकारी कार्यकर्ते यांची  कथित ‘वज्रमूठ’ त्यांनी उभी केली. प्रसंगी शिवसेनेचा ‘राजीनामा’ देवू. पण, आता निर्णय घेतलाय, असे म्हणणाऱ्या शिवतारेंनी ३० मार्च २०२४ रोजी अचानक माघार घेतली. येथूनच शिवतारे समर्थकांची अडचण झाली.

शिवतारे यांचे राजकारण हे पवार विरोधावर बेतलेले राहिले आहे. ते पवारांवर या आधी पण असेच बोलत होते. त्यामुळे त्यांच्या २००९ ते २९ मार्च २०२४ च्या भूमिकेत सातत्यता दिसली.  त्यामुळे पण त्यांनी ज्या पद्धतीने यू टर्न घेतला तो अनेकांना रूचला नाही. त्यांनीच पवार विरोधाची आग इतकी पेटवली की नंतर ती विझवताना त्यांचीही अडचण झाली.

त्याबद्दलचे एक पत्रही व्हायरल झाले. त्यातील काही प्रश्न हे शिवतारेंना बोचणारे आहेत. अजित पवारांची गुर्मी तशीच आहे म्हणणाऱ्या विजय शिवतारेंना आता कशाचा साक्षात्कार झाला आहे, असा हा सवाल आहे.  पवारांच्या विरोधात बारामतीत  ५ लाख ८० हजार मतदारांचा कैवार शिवतारे यांनी घेतला होता, त्यांनी आता नेमकं काय करायचं, यावरही शिवतारे यांना विचारण्यात आले आहे. आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का? तुमच्याचं भाषेत त्यांची गुर्मी आणि माज उतरला आहे का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का? त्यांचं कॉलिफिकेशन काय? असा प्रश्न तुम्हीचं उपस्थित केला होता. मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान कारायचं का आणि कशासाठी?

या साऱ्या प्रश्नांवर विजय शिवतारेंनी बोलावे असा आग्रह या पत्रात धरण्यात आला आहे.

एक कॉल, खासदार पडण्याचा धोका अन् बापूंनी निर्णयच फिरवला; शिवतारेंनी सांगितलं माघारीचं कारण

बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे, असे या पत्रात म्हटले आहे.  “तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुध्दा. तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करीत आलो आहे. २०१९ ला सुध्दा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलो आहे. कारण, तुम्ही माझे नेते आहात. पण, काल माझा नेता असा संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला, याचं फार वाईट वाटलं. बापू, ज्या मिडीयाने तुम्हाला डोक्यावर घेतलं, त्याचं मिडीयाने तुमची लया फार घालवून टाकलं. सोशल मिडीयात तर तुम्हाला ‘महाराष्ट्राचा पलटूराम’ म्हणून ‘हॅशटॅग’ फिरवला जात आहे. ‘पुरंदरचा मांडवली सम्राट’,’पाकीट भेटलं का?’, ‘घुमजाव’, ‘शिवतारे जमी पर’, ‘चिऊतारे’, ‘शेवटी, आपला आवाका दाखविला’, ‘५० खोके शिवतारे ओके’, अशा खोचक कंमेंटचा सोशल मिडीयात मुसळधार पाऊस पडतो आहे,“असा सारा उल्लेख या पत्रात आहे.

पत्रातील पुढचा मजकूरही असाच स्फोटक आहे.

“अजित पवारला माझा आवाका कळेल? म्हणणारे तुम्ही आवाका दाखविण्याच्या आधीच ‘शेपूट’ घातलंत. मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे, हे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांनी सांगितले. असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या ५ लाख ८० हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं? हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडवून आणला की, तुमचा बोलविता धनी दुसराच कुणी होता? तुम्ही कुणाची स्क्रिप्ट वाचत होतात? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय ? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? तुम्ही म्हणजे ‘फाडा पोस्टर निकला चूहा’ नव्हेत का?

हा कार्यकर्ता पुढे म्हणतो.. “सगळं वाचून तुम्हाला राग येईल. तुमची चिडचिड होईल. पण, बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं. तेव्हा अख्खा गावानं दस्तुरखुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला ‘पोपटलाल’ म्हटलं. त्यामुळे चिडून मी सर्व पै पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्र परिवार, गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला. तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली. पण, आज तुम्ही माघार घेतली आणि माझी गोची झाली. आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उध्दार करू लागलेत. त्यामुळे मी फोन बंद करून बसलोय. म्हणून आता तुम्हीचं एखादी पत्रकार परिषद घेवून या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. तसाही पत्रकार परिषद घेवून ‘गोंधळ’ घालण्याचा तुम्हाला जुनाचं ‘नाद’ आहे. असो, जमेल तेवढं करा ओ. माझी अडचण होत आहे. तूर्तास तरी थांबतो !“

एकूणच या पत्राच्या निमित्ताने शिवतारे यांच्यावर शरसंधान करण्यात आले आहे. लिहिणारा शिवतारेंचा समर्थक कार्यकर्ता आहे की नाही, याची पडताळण झाली नाही. पण पत्रातील मुद्दे हे शिवतारेंनाही विचार करायला लावणारे आहेत.

एकूणच तडजोड करताना आपलीच विश्वासर्हता धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणे किती महत्वाचे असते, याचा धडाच या निमित्ताने अनेक राजकारण्यांना शिवतारेंच्या या साऱ्या प्रकरणामुळे मिळाला असेल.

Exit mobile version