कंपनीला टाळे अन् पोलिसांकडून शोध सुरु; शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर
Parth Pawar Land Scam : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील
Parth Pawar Land Scam : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1804 कोटी रुपये बाजाराभाव असलेली 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये घेतल्याने या प्रकरणात राजकारण चांगलेच तापले आहे. प्रकरणात नवीन नवीन खुलासे होत असून पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत तीन जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात पार्थ पवार यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटीय यांच्यासह शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शीतल तेजवानी फरार असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.
या जमीन व्यवहारासाठी शीतलने वापरेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला होता त्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळे आहे. शीतल तजेवानीला अटक केल्यानंतर या प्रकरणात पार्थ पवार यांचा काय रोल आहे याबाबत सविस्तर माहिती समोर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोण आहे शीतल तेजवानी ?
या प्रकरणातील मुख्य व्यक्ती ठरलेली शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) हिच्याबद्दल आता नव्या आणि चक्रावून टाकणाऱ्या बाबी उघडकीस येत आहेत. प्राप्त माहितीनुसार, संबंधित 40 एकरांचा भूखंड हा मूळतः बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता. सरकारी ताब्यातील ही जमीन सोडवून तिच्या विक्रीसाठी तेजवानीने युक्ती रचल्याचे तपासात समोर आले आहे. तिने मूळ 272 मालकांना शोधून त्यांच्याकडून नाममात्र 10 ते 15 हजार रुपयांच्या मोबदल्यात कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी (POA) आपल्या नावावर घेतल्याचे समोर आले आहे. या व्यवहाराचा पाया हाच फसवणुकीवर आधारलेला असल्याचे तपास अधिकाऱ्यांच प्राथमिक निरीक्षण आहे. याच पार्श्वभूमीवर, 2025 साली तेजवानीने ‘अमेडिया कंपनी’च्या भागीदारीबद्दल माहिती मिळवून पुढील आर्थिक गणित आखले, असे सांगितले जाते.
या कंपनीत पार्थ पवार यांचा 99 टक्के, तर दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांचा 1 टक्का हिस्सा आहे. हे गिऱ्हाईक लाभदायक ठरेल, हे लक्षात घेऊन तेजवानीने पुढील व्यवहार रचल्याची चर्चा आहे. मात्र, शीतल तेजवानीचा भूतकाळही संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याचा आरोपी असून, त्याची चौकशीदेखील झाल्याची नोंद आहे. या दाम्पत्यावर तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. दस्तऐवजनुसार, सागर सूर्यवंशीने ‘रेणुका लॉन्स’ च्या नावावर दोन वाहन कर्जे आहेत एक 1.16 कोटी आणि दुसरे 2.24 कोटी रुपये घेतली आहेत. शीतल तेजवानीनेही दोन वाहनांसाठी 4.80 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे नोंदीत आढळते. त्याशिवाय सागर सूर्यवंशीने ‘सागर लॉन्स’च्या नावावर 16.48 कोटींचे कॅश क्रेडिट कर्ज, तर शीतल तेजवानीवर स्वतंत्र 10 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे.
तिच्या ‘पॅरामाउंट इन्फ्रा’ या कंपनीवर 5.95 कोटी, तर ‘रेणुका लॉन्स’च्या नावावर आणखी 5.25 कोटींचे कर्ज असल्याने, या दाम्पत्याची एकत्रित थकबाकी कोट्यवधी रुपयांत गेल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, शीतल तेजवानी सध्या कुठे आहे, तिचे कार्यालय कुठे आहे तसेच,ती कुठे कामकाज पाहते, याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी ही अत्यंत महत्त्वाचे दुवा असल्याने, तिच्या चौकशीमधून अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांच्यातील संबंधांवर नव्या माहितीचा पडदा उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढे या प्रकरणात काय ट्विस्ट येतो आणि काय नवीन बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास याप्रकरणी पार्थ पवारांच नाव समोर आल्यानंतर कुठल्याही चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे मात्र, प्रत्यक्षात काय होतं हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.
बिहारमध्ये ‘व्होट चोरी’? भाजपचे माजी खासदार राकेश सिन्हांकडून 10 महिन्यांत दोन ठिकाणी मतदान
आरोप काय?
जागेची पॉवर ऑफ एटर्नी असल्याचे सांगत जमीन विकली म्हणून शीतल तेजवाणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मुद्रांक शुल्काचे पाच कोटी 89 लाख रुपये बुडवले असा आरोप करत पार्थ पवार यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी असूनही खरेदी-विक्रीवरचा 2 टक्के अधिभार आणि कर वसूल केला नसल्याने रविंद्र तारुवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
