एक कॉल, खासदार पडण्याचा धोका अन् बापूंनी निर्णयच फिरवला; शिवतारेंनी सांगितलं माघारीचं कारण
Vijay Shivtare : मागील पंधरा दिवसांपासून अजित पवार यांच्या विरोधात बंडाची भाषा करणाऱ्या माजी आमदार विजय शिवतारे यांनी (Vijay Shivtare) आज माघार घेतली. बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार असा निर्णय त्यांनी आज पत्रकार परिषद घेत जाहीर केला. या निर्णयानंतर बारामतीत अजितदांचं टेन्शन कमी झालं आहे. यानंतर आता विजय शिवतारे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली याचंही उत्तर मिळालं आहे. याचा खुलासा शिवतारे यांनीच केला आहे. मी जर निवडणुकीला उभा राहिलो असतो तर दहा ते बारा जागांवर आपले उमेदवार पडू शकतात असे मला सांगितले गेले होते. त्यामुळेच मी माघार घेतली, असे शिवतारे यावेळी म्हणाले.
निवडणुकीतील उमेदवारीबाबत विजय शिवतारे आज पुढील भूमिका जाहीर करणार होते. यासाठी त्यानुसार आज त्यांनी आपली भूमिका जाहीर करत निवडणूक रिंगणातून माघार घेतली. माघार घेण्यामागे काय कारणे होती याचा खुलासा शिवतारे यांनी माध्यमांसमोर केला. माझी मुख्यमंत्र्यांबरोबर फोनवर चर्चा झाली. प्रत्यक्ष भेटून दोनदा चर्चाही केली. तरीही मी माझा निर्णय बदलला नव्हता. पण नंतर मला एक फोन आला.
हा फोन मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकरांचा होता. त्यांनी मला सांगतिलं की मुख्यमंत्र्यांना तुमच्यामुळे अडचण होत आहे. महायुतीला सुद्धा तुमच्यामुळे अडचण होत आहे. अशा पद्धतीने जर सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहिले तर आपले दहा ते बारा खासदार पडण्याचा धोका आहे. मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर माझी बैठक झाली. या बैठकीत मी माझी बाजू मांडली. माझ्या ज्या काही मागण्या होत्या त्या देखील सांगितल्या. आमच्या या तहातून काही चांगल्या गोष्टी घडल्या तर त्याचा मला आनंदच होईल.
मोठी बातमी : अजितदादांचं टेन्शन संपलं; शिवतारेंची बारामती मतदारसंघातून माघार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवतारेंवर कारवाई होणार असल्याच्या वृत्त समोर आले होते. त्यावर बोलताना शिवतारे म्हणाले होते की, माझ्यावर कारवाई होणार अशा बातम्या येत आहेत. बघू पुढे काय होते ते. काल्पनिक मुद्द्यांवर बोलणं योग्य होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी लोकसभा निवडणूक लढणार आणि विजयी होणार असल्याचा विश्वास शिवतारेंनी व्यक्त केला होता. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी अशी विनंती केली होती. तसेच असे न झाल्यास मी शिवसेनेतून बाहेर पडले असा इशाराही दिला होता. मात्र, आता शिवतारेंनी बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेण्याचे जाहीर केल्याने बंडाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.