Download App

‘भारत सरकार’चा ‘मोदी सरकार उल्लेख का?; ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेवर वडेट्टीवारांचा खोचक टोला

Vijay Wadettivar On BJP : देशात आता आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झालं आहे. एकीकडे विरोधकांकडून सडकून टीका होतेयं, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेवरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे.

केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेवरुन वडेट्टीवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भातील त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. वडेट्टीवार पोस्टमध्ये म्हणाले, “शासकीय यंत्रणा ही केंद्र सरकारची असून भाजपकडून स्वत:चे कर्मचारी म्हणून का राबवत घेत आहेत? जनतेची कामे सोडून सत्ताधारी शासकिय यंत्रणा मोदींच्या प्रचारासाठी का वापरून घेत आहे? कार्यालयात येणाऱ्या जनतेची कामे कोण करणार? संविधानानुसार ‘भारत सरकार’ आहे. संकल्प यात्रा रथावर “मोदी सरकार” असा उल्लेख का?” असा खोचक सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर पलटवार! तुफान बॉम्बफेकीत 20 जणांचा मृत्यू

तसेच “प्रचाराला नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दबाव का? हे प्रश्न आता राज्यातील शासकीय कर्मचारी सत्ताधाऱ्यांना विचारू लागले आहे. हा देश आणि येथील प्रशासकीय व्यवस्था आपल्या मालकीचा असून त्यांचा हवा तसा वापर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपण करून घेऊ शकतो या भ्रमातून भाजपने जागे व्हावे” असाही सल्लाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. या यात्रेत शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्त केलं आहे. ग्रामीण भागातील जनतेकडून आम्हाला त्रास होत असल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. या जाचाला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी संकल्प यात्रेसाठी नकार दिल्याचं पत्रच वडेट्टीवारांनी शेअर केलं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून या पत्राबाबत काय निर्णय घेतला जाईल? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us