आमदार प्राजक्त तनपुरेंना भावलेला ‘विखे पॅटर्न’ नेमका काय?

Vikhe Patil Pattern-Vikhe Patil Pattern-तनपुरे यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर विखे पॅटर्नबद्दल आपलं हे मत व्यक्त केल्यानं अहिल्यानगरच्या राजकारणातील विखे पॅटर्न पुन्हा चर्चेत आलाय.

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil

विजयसिंह होलम
कार्यकारी संपादक
लेट्सअप- आय लव्ह नगर

Vikhe Patil Pattern : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकार मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी एका भाषणात विखे पॅटर्नचा (Vikhe Patil Pattern) उल्लेख केला. तनपुरे म्हणाले, ‘मी विखे पाटील यांच्या झटपट कार्यशैलीबद्दल ऐकून होतो. आतापर्यंत आम्ही ते दूरवरून पाहायचो. आता त्याचा स्वतः अनुभव घेतला. मी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरूवारी आमदार झालो. विखे पाटलांच्या झटपट कार्यशैलीमुळे हे शक्य झालं.’

इतकी वर्षे विरोधात असलेल्या तनपुरे यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर विखे पॅटर्नबद्दल आपलं हे मत व्यक्त केल्यानं अहिल्यानगरच्या राजकारणातील विखे पॅटर्न पुन्हा चर्चेत आलाय. अर्थात याला अनेक कंगोरे आहेत. मुळात विखे पॅटर्न नेमका काय आहे, ते भल्याभल्यांना लक्षात आलेलं नाही. अनेकांना त्यातून फायदा झाला, तेवढ्यांनाच फटकाही बसल्याची उदाहरणं चर्चेत असतात.


पाऊस तोंडावर असताना मराठवाड्यात पाण्याचं संकट कायम; टँकरची संख्या चारशेच्या घरात

विखे यांची राजकारणाची ही पद्धत म्हणा, किंवा शैली म्हणा खूप जुनी आहे. त्यासासाठी थेट दिवगंत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळात जावं लागेल. बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेस आणि काही काळ शिवसेना व पुन्हा काँग्रेस असं काम केलं आहे. काँग्रेसमध्ये फार काही मिळालं नसलं तरी शिवसेनेत त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं होतं. मात्र, त्यांचं राजकारण बहरलं ते काँग्रेसमध्येच. पक्षाच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाला प्रश्न विचारण्याची, चुका आणि सुधारणा सुचविण्याची धमक त्यांच्यात होती. पक्ष अतिशय ताकदवान स्थिती असताना आणि कोणी बोलण्याची हिंमत करीत नसताना विखे पाटील ती करीत होते. त्यातूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी त्यांचंच राजकीय वैर निर्माण झालं, ते कायमचंच. जिल्ह्यात राजकारण करताना मात्र, विखे पाटील एकीकडं आणि अन्य नेते एकीकडं अशी परिस्थिती राहिली.

पुढे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काळातही हाच पॅटर्न कायम राहिला. विखे पाटील काँग्रेसमध्ये असतानाही इतर नेत्यांनी कायम त्यांना विरोधच केला. त्याला तोंड देत विखे पाटील यांची वाटचाल सुरू राहिली. विखे पाटील पक्षातील नेत्यांना ताकद देण्यापेक्षा त्यांना मागं खेचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची पक्षविरहित पर्यायी आघाडी पुढं करतात, असा त्यांचावर आरोप केला जात असे.

आता कर्ज मिळणं अवघड होणार? ‘सिबिल’ ची अट अन् बरंच काही…; RBI कडून नियमांचा ड्राफ्ट जारी

बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळातही अशीच जिल्हा विकास आघाडी कार्यरत होतीच. पुढं राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तर पहिल्याच निवडणुकीत त्यांच्यावर पाडापाडी केल्याचा आरोप झाला. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदारांनी त्यांच्याविरूद्ध आघाडी उघडली. एकत्र येत पक्षाकडं लेखी तक्रार केली. समितीमार्फत यावर चौकशी झाली. योग्य त्या सूचना गेल्या आणि प्रकरण मिटलं. राज्यातील नेत्यांसोबत संपर्क आणि समन्वय ठेवताना विखे पाटील दिल्लीतील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्याही संपर्कात राहातात, यातून आपल्याला हवे तसे करून घेण्याची त्यांची पक्षांतर्गत ताकद वाढत असल्याचे सांगण्यात येतं.

त्यानंतर भाजमधील वेगळाच विखे पॅटर्न समोर आला. पक्षानं जिल्ह्यातील निवडणुकांची जबाबदारीच विखे पाटील यांच्याकडं सोपविली. पक्ष प्रवेश घडवून आणने
असो की उमेदवारांना विजयी करणं असो, याची जबाबदारी विखे पाटील यांच्यावर सोपविण्यात येऊ लागली. स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर विधान परिषद निवडणूक, राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आणि आता पुन्हा विधान परिषदेची निवडणूक यांची जबाबदारी पक्षानं विखे पाटील यांच्यावर सोपविली होती. विखे पाटील यांनी पक्षाची आणि आपली यंत्रणा लावून ती यशस्वी करून दाखविली. याचाच अनुभव तनपुरे यांनी घेतला. त्यातून त्यांचे हे वक्तव्य आलं असावं.

नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किंवा गावात विखेंना मानणारा कार्यकर्त्यांचा गट आहे. विखे ज्याला सांगतील त्याला ते मतदान करतात. अशी ताकद जिल्ह्यात कोणत्याच नेत्यात नाही. त्यामुळे सहकार क्षेत्रातील निवडणूक असो की राजकीय त्यात विखे गटाची भूमिका काय, याची उत्सुकता नेहमीच असते. विखे यांना कधी ना कधी कोणत्या निवडणुकीत पराभव सहन करावा लागतो. मग त्याचा वचपा ते सारी शक्ती पणाला लावून काढतात. विधानसभेच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात, राणी निलेश लंके यांचा पराभव या प्रत्युत्तराच्या भूमिकेतून झाला होता. राजकीय प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवणणं ही विखे गटाचे नियमित वैशिष्ट्य राहिले आहे.

फक्त प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी उभं राहून 2029 च्या लोकसभा निवडणुकीचं गणित विखे पाटील यांनी सोपं केल्याचंही दिसून येत आहे. त्या निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांना फक्त सुमारे नऊ हजार मतांची आघाडी होती. त्यावेळी तनपुरे यांनी लंके यांचं काम केलं होतं. त्यामुळं लंके यांना राहुरी विधानसभा मतदारसंघात चांगली मतं मिळाली.

आता लंके यांच्यापासून तनपुरे दूर म्हणजे भाजपमध्ये गेल्यानं ही घडामोड विखे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीसाठीची जुळणी आहे, असं देखील बोललं जातं. त्यामुळंच विखे पॅटर्न मुख्यतः पाडापाडीचा असला तरी आपलं इप्सित साध्य करण्यासाठी प्रसंगी विरोधकांना आपल्या तंबूत घेणं, ही लवचिकता देखील विखे यांच्याकडं आहे.

एकीकडं पक्षातील आपलं स्थान पक्कं ठेवायचं. आपल्या सोयीच्या लोकांना ताकद द्यायची, त्यासाठी पक्षाची आणि आपली पर्यायी यंत्रणा वापरायची. ठरवलं तसं करण्याचा अटोकाट प्रयत्न करायचा आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आपण कायम राहून राजकारणावर आपली पकड काय ठेवायची, असा हा विखे पॅटर्न आहे. यातून ज्यांचा फायदा होतो, त्यांना तो पटतो, ज्यांना फटका बसतो त्यांच्याकडून टीकाही होते. नव्यानं आलेल्या तनपुरें यांना सध्या तरी चांगला अनुभव आला आहे, पुढं काय होतय, ते येणाऱ्या काळातच कळेल, हे मात्र नक्की.

Exit mobile version