Download App

पाटील, मंडलिक, महाडिक की आणखी कोणी? लोकसभेचे गणित यंदा कोल्हापूरकरच ठरवणार!

‘आमचं ठरलयं’ इथपासून ते ‘आमचं तुटलयं’… असा प्रवास पाच वर्षात पूर्ण करत कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातील राजकीय वातावरण 180 अंशात बदलले आहे. गतवेळी आमचं ठरलयं म्हणत जे सतेज पाटील (Satej Patil) पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन शिवसेनेच्या संजय मंडलिकांच्या विजयासाठी प्रयत्न करत होते त्याच सतेज पाटलांनी आता मंडलिकांच्या पराभवासाठी फिल्डिंग लावली आहे. तर ज्या मंडलिकांच्या विरोधात धनंजय महाडिक उभे ते महाडिक आता स्वतः मंडलिकांच्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसून येणार आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप-शिवसेना आणि काँग्रेसच्या साठमारीत मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला तर त्यांच्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच ठरण्याची दाट शक्यता आहे.

नेमकी काय आहेत ही सगळी गणित तेच आपण या लेखातून समजून घेणार आहोत.

सगळ्यात आधी कोल्हापूर मतदारसंघाची रचना समजून घेऊ :

कोल्हापूर मतदारसंघाची रचना शहरी, ग्रामीण आणि अतिग्रामीण अशा तिन्ही प्रकारात आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण हे दोन शहरातील मतदारसंघ आहेत. कागल, करवीर सारखे शहरी आणि ग्रामीण असे मिक्स मतदारसंघ आहेत. तर राधानगरी आणि चंदगड सारखे ग्रामीण आणि अतिग्रामीण मतदारसंघही याच मतदारसंघात आहेत.

नाशिक : महायुतीत हेमंत गोडसे फिक्स; ‘मविआ’मध्ये ठाकरेंची मोर्चेबांधणी अन् पवारांचीही चाचपणी

एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेस बालेकिल्ला होता. उदयसिंह गायकवाड यांनी काँग्रेसच्या तिकीटावर इथून तब्बल पाचवेळा विजय साकारला. 1999 नंतर सदाशिवराव मंडलिकांमुळे काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादीकडे सरकला. पण 2009 मध्ये “आता बैल म्हातारा झाला आहे, नवीन खोंड निवडा.” असं म्हणत शरद पवारांनी मंडलिकांना डावलून संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी दिली. मंडलिकांनी अपक्ष अर्ज भरला आणि निवडून आले.

2014 साली राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिकांनी बाजी मारली. 2019 साली पुन्हा धनंजय महाडिकांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. पण युती धर्म बाजूला ठेवत सतेज पाटलांनी जुने हिशोब चुकते करायचे म्हणून आमचं ठरलयं असं म्हणत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा जाहीर प्रचार सुरु केला. निकाल लागल्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या मदतीने शिवसेनेचा भगवा फडकला. आता पाच वर्षांनंतर राज्याच्या राजकारणात जसे कमालीचे बदल झाले अगदी तसेच कोल्हापूरच्याही राजकारणात झाले.

 

सध्याची परिस्थिती काय आहे?

महायुती :

आता संजय मंडलिक शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या गटात आहेत. शिवाय राधानगरीचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर, करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही एकनाथ शिंदेंसोबत जाणे पसंत केले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ, चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजितदादांसोबत गेले आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील ए. वाय. पाटील, रामप्पा करिगार असे नेतेही अजितदादांसोबत आहेत.

धनंजय महाडिक भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. सोबतच महादेवराव महाडिक, अमल महाडिक हे माजी आमदारही भाजपची ताकद म्हणून ओळखले जातात. सत्यजित कदम, महेश शिंदे हे शहरातील आणि कागलचे समरजितसिंह घाटगे, चंदगडचे शिवाजी पाटील, संग्रामसिंह कुपेकर असे 30 ते 40 हजार मतांची ताकद असलेले ग्रामीण भागातील नेतेही सध्या भाजपकडे आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची मिळणारी रसद ही भाजपसाठी महत्वाची शिदोरी आहे.

महाविकास आघाडी :

सतेज पाटील यांनी मागील पाच वर्षांमध्ये जिल्हात शिवसेनेच्या ताकदीवर अंकुश लावत काँग्रेसची ताकद वाढविली आहे. विधानसभेला करवीरमध्ये पी.एन. पाटील, उत्तरमध्ये जयश्री जाधव, दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे आमदार निवडून आले. सोबतच महापालिका, जिल्हा परिषद, गोकूळ दूध संघ, विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आमदारकी सतेज पाटील यांनी आपल्या ताब्यात घेतली. माजी आमदार के. पी. पाटील आधी अजितदादांसोबत गेले पण नंतर काँग्रेस आणि सतेज पाटलांसोबत संधान साधले. त्यामुळे आता राधानगरी मतदारसंघातही काँग्रेसची ताकद वाढली आहे.

कागलचे माजी आमदार संजय घाटगे वगळता शिवसेना (UBT) कडे लोकांमधून निवडून आलेला मोठा नेता नाही. त्यामुळे संघनेतील नेत्यांवरच सध्या ठाकरे गटाची मदार आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनाच शिवसेनेचा मोठा चेहरा म्हणायला हवे. तिसऱ्या बाजूला शरद पवार यांच्याकडेही मोठा चेहरा नाही. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांची ताकद मर्यादित झाल्याची चर्चा आहे.

2024 चे गणित कसे असेल?

याच सगळ्या चित्रामुळे सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा क्लेम मजबूत असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना (UBT) ने ही आपला विजयी मतदारसंघ असल्याचे म्हणत कोल्हापूर सोडण्यास नकार दिला आहे. इथून संजय पवार उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र संख्याबळ आणि ताकदीच्या जोरावर काँग्रेस हा मतदारसंघ घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

याशिवाय ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्हीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याबाबत रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाराजांनीही मागील काही दिवसांमध्ये धुमधडाक्यात साजरा केलेला अमृत महोत्सवी वाढदिवस, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी अंतरवाली सराटी गावात लावलेली उपस्थिती, त्यानंतर त्यांच्या सभेला आणि राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यास, शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील संघर्षा वेळी थेट रस्त्यावर उतरत समझोता घडवून आणण्याचा केलेला प्रयत्न यासह अन्य काही घटनांमुळे महाराज लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय जुनी जखम अद्याप विसरलेलो नाही असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.

तर महायुतीमध्ये सध्या तरी कोल्हापूरची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटेल आणि संजय मंडलिक हेच पुन्हा उमेदवार असतील असे चित्र आहे. अनेक प्रयत्न आणि संघर्षाने मिळविलेली धनंजय महाडिक यांची राज्यसभेची खासदारकीची मुदत अजूनही पाच वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे ते लगेच ही खासदारकी सोडून लोकसभेला रिस्क घेतील याची शक्यता कमी आहे. पण भाजपने ऐनवेळी निवडणूक लढण्यास सांगितले तरीही महाडिक यांची तयारी असल्याचे दिसून येते. कारण गतवर्षभरापासूनच त्यांनी मतदारसंघातील संपर्क कमालीचा वाढविला आहे.

लोकसभेच्या मागील तीन निवडणुकांचा निकाल :

2009 :

सदाशिवराव मंडलिक, अपक्ष : 4 लाख 28 हजार 082

संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रवादी : 3 लाख 83 हजार 282

विजय देवने, शिवसेना : 1 लाख 72 हजार 822

2014 :

धनंजय महाडिक, राष्ट्रवादी : 6 लाख 7 हजार 665

संजय मंडलिक, शिवसेना : 5 लाख 74 हजार 406

2019 :

संजय मंडलिक, शिवसेना : 7 लाख 49 हजार 085

धनंजय महाडिक, राष्ट्रवादी : 4 लाख 78 हजार 517

follow us