सिंधुदुर्ग : एकनाथ शिंदे पाकीट पोहचविणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे ठाकरेंनी खोके खोके बोलायचे सोडावे, निवडणुकीत तुमचे काहीही होणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. पण यातून शिंदे हे पोहचविणाऱ्यांपैकी एक आहेत, असे म्हणत नारायण राणे यांनी स्वतःच्याच नेत्याबद्दलही सत्य सांगून टाकले असल्याचे बोलले जाते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा नुकताच कोकण दौरा झाला. यात त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना भेटी दिल्या. इथे त्यांनी खळा बैठकाही (अंगण बैठका) घेतल्या. त्यांच्या याच दौऱ्यावर टीका करण्यासाठी राणे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांवर निशाणा साधला. (While criticizing Uddhav Thackeray, Narayan Rane also criticized Eknath Shinde)
यावेळी राणे यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांवर ५० खोके अर्थात ५० कोटी मिळाल्याचा आरोप केला जातो याबद्दल सवाल विचारला. यावरच भाष्य करताना नारायण राणे यांनी ठाकरेंच पाकिटातून पैशांच्या देवाण-घेवाण करत असल्याचा आरोप केला.
राणे म्हणाले, “ज्यांनी पाकिटांची डिलिव्हरी केली त्यांनी शिंदेंवर बोलू नये. त्यावेळचे खोके कुठे गेले? कसे जात होते? कोणती वेळ असायची, कोणाच्या हातात दिले, कोणत्या माळ्यावर जायचे? मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण त्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे रहायचे म्हणून मला त्यावर अधिक काही बोलायचे नाही.
एकनाथ शिंदे पाकीट पोहोचवणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे ठाकरेंनी खोके खोके बोलायचे सोडावे, निवडणुकीत तुमचे काहीही होणार नाही,” अशी टीका राणे यांनी केली. मात्र शिंदे यांच्याबद्दल पाकीट पोहचवत असल्याचे म्हणत राणेंनी त्यांच्याच नेत्यावर भाष्य केले.