पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघ. गेल्या वीस वर्षात हा मतदारसंघ नेहमीच दोन गटात विभागला गेला आहे. ते दोन गट म्हणजे कुल गट आणि थोरात गट. पक्ष कोणताही असला तरी या दोघांमध्येच तालुक्याची राजकीय ताकद विभागली गेली आहे. मात्र या दोन्ही गटांना हादरा देणारा निकाल लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) लागला. विद्यमान आमदार राहुल कुल (Rahul Kool) आणि माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) हे एकत्रितरित्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या बाजूने होते. त्यानंतरही या मतदारसंघात या दोघांना मोठा फटका देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे लीड घेतले. यातूनच या दोघांना वगळून तिसरी शक्ती या मतदारसंघात उदयास आल्याची चिन्हे या निमित्ताने दिसून आले आहेत. नेमकी कोण आहे ही तिसरी शक्ती? आणि येत्या विधानसभेला ही तिसरी शक्ती या दोन्ही गटांना कशी आव्हानात्मक ठरु शकते? कोण उमेदवार असू शकतात? (Who will be the candidate of NCP Sharad Chandra Pawar party against BJP’s Rahul Kul in Daund?)
1990 मध्ये उशादेवी जगदाळे यांचा पराभव करत अपक्ष सुभाष कुल दौंडचे आमदार झाले. तेव्हापासून दौंड मतदारसंघाच्या राजकारणावर कुल घराण्याचा दबदबा आहे. 1995 मध्ये राज्यात काँग्रेसविरोधी लाट असताना सुभाष कुल यांनी काँग्रेसच्या पंजावर तब्बल 92 हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळविला होता. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा सुभाष कुलही पवारांसोबत आले. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर ते तिसऱ्यांदा आमदार झाले. त्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या प्रेमसुख कटारिया यांना केवळ 18 हजार मते होती. त्यावरुन दौंड मतदारसंघावर कोणत्याही पक्षापेक्षा कुल यांचे किती एकहाती वर्चस्व होते याचा अंदाज येऊ शकतो.
अशात 2001 मध्ये सुभाष कुल यांचे निधन झाले. त्यानंतर दौंडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यात रंजना कुल विजयी झाल्या. पण याच घटनेनंतर दौंडच्या राजकारणात कुल यांच्या वर्चस्वाला रमेश आप्पा थोरात यांनी पहिल्यांचा आव्हान दिले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रंजना कुल निवडणूक रिंगणात होत्या. त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. थोरात हे 1985 पासून आजपर्यंत जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. या 40 वर्षांपैकी तब्बल 13 वर्षे ते बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. अजित पवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे रमेश थोरात यांना त्यावेळी अजित पवार यांचाही आशीर्वाद असल्याची चर्चा होती. पण त्या निवडणुकीत रंजना कुल 24 हजार मतांनी विजयी झाल्या.
2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रंजना कुल यांचे चिरंजीव राहुल कुल यांना उमेदवारी दिली. त्यावेळीही रमेश थोरात बंडखोरी केली. यावेळी मात्र थोरात यांनी 17 हजार मतांनी बाजी मारली. कुल घराण्याने पहिल्यांदाच पराभव बघितला. या अंतर्गत राजकारणाला वैतागून 2014 ची लोकसभा निवडणूक पार पडताच राहुल कुल यांनी रासपचा झेंडा हाती घेतला. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत दौंडमधून रासपच्या महादेव जानकर यांना 25 हजारांचे लीड होते. याच वातावरणाचा फायदा कुल यांनाही झाला. दौंडमधील निर्णायक धनगर मते आणि भाजपचा पाठिंबा या बळावर त्यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचा 11 हजार मतांनी पराभव केला. राहुल कुल यांनी गेलेली आमदारकी पुन्हा घरात आणली.
2019 मध्ये कुल यांनी रासपऐवजी भाजपचा एबी फॉर्म जोडला. पुन्हा रमेश थोरात विरुद्ध राहुल कुल अशी लढत रंगली. यावेळी रासप सोडल्याचा परिणाम, कारखान्यातील भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्याचा निकालावर परिणाम बघायला मिळाला. रमेश थोरात यांनी कुल यांना चांगलाच घाम फोडला होता. अगदी अंतिम फेरीपर्यंत निकाल स्पष्ट नव्हता. कुल पडतात की काय असे चित्र तयार झाले होते. पण अखेरीस कुल यांचा 673 मतांनी निसटता विजय झाला. तेव्हापासून कुल यांनी सावध होत बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली. भाजप वाढविण्याठी देवेंद्र फडणवीस यांनीही कुल यांना ताकद दिली.
आता राहुल कुल भाजपमध्ये आहेत. पण मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर कुल यांचे पारंपारिक विरोधक रमेश थोरात हेच अजितदादांसोबत आले. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना दौंड मतदारसंघातून आघाडी मिळाली नव्हती. यावेळी तर कुल आणि थोरात हे दोन्ही गट महायुतीतच असल्याने यंदाही दौंडमधून त्यांना आघाडी मिळणारच नाही, असा सर्वांचा अंदाज होता. पण सुळे यांनी दौंडमध्ये 25 हजारांची आघाडी घेतली. आता या मताधिक्याने महाविकास आघाडी आणि त्यातही शरद पवार यांना दौंडची आमदारकी टप्प्यात आली असल्याचा कॉन्फिडन्स आला आहे.
यात शरद पवार यांचा उमेदवार कोण असणार एवढाच प्रश्न बाकी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात यांचा थोडक्यात पराभव झाला होता. आता यंदा तरी आमदारकी जिंकायचीच असा निश्चय करुन थोरात समर्थक जोरदार तयारी करत आहेत. पण त्यांना निवडणूक लढवायची असल्यास अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे दोनच पर्याय आहेत. थोरात यांचे समर्थक त्यांना शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्याचा आग्रह करत आहेत. पण थोरात अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. ते जिल्हा बँकेचे विद्यमान संचालकही आहेत. त्यामुळे ते अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्याकडे जातील असे सध्याचे तरी चित्र दिसत नाही. शिवाय रमेश थोरात सोबत नसूनही लोकसभेला 25 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे शरद पवार हेही थोरात यांच्याबाबत कितपत सकारात्मक भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.
सध्याच्या घडीला शरद पवार यांच्याशी निष्ठावान राहिलेल्या आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी जीवतोड मेहनत घेतलेल्या तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस नामदेव ताकवणे हेही इच्छुक आहेत. भाजपकडून यंदाही राहुल कुल हेच उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. सलग 10 वर्षे सत्ता हातात असल्याने केलेल्या विकासकामांच्या जोरावर राहुल कुल यांनाही उमेदवारी आणि आमदारकी कायम राखू असा आशावाद आहे. पण महायुतीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे देखील इच्छुक आहेत. यात आता कोण बाजी मारणार आणि कोण विधानसभा गाठणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.