Download App

दानवेंच्या घराला यंदा आमदारकीचाही ‘चकवा’? 862 मतांनी वाढवली धाकधूक

भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार?

जालना जिल्ह्यात निवडणूक काळात सर्वाधिक चर्चेचा विषय असतो तो भोकरदन विधानसभा मतदारसंघाचा (Bhokardan Assembly Constituency). माजी केंद्रीय मंत्री, जालन्याचे पाचवेळचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांच्या प्रभावाखालील या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असते. गत दोन विधानसभा निवडणुकीत इथून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे (Santosh Danave) आमदार आहेत.  मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला.

याशिवाय भोकरदन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांना 862 मतांची निसटती आघाडी मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकत्यांचे मनोबल उंचावले आहे. खासदारकीपाठोपाठ दानवे यांच्या घरातून आमदारकीही वजा करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्लॅनिंग करत आहेत. या प्लॅनिंगमध्ये महाविकास आघाडीला यश येणार का? की दानवे पिता-पुत्र आमदारकी वाचवणार? काय घडतंय भोकरदन विधानसभा मतदारसंघात? (Who will be the candidate from Mahavikas Aghadi against BJP candidate Santosh Danve in Bhokardan Assembly Constituency?)

पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

भोकरदन म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या हक्काचा मतदारसंघ. सरपंच, पंचायत समिती सभापती असा प्रवास करत दानवे यांनी 1985 साली पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. यात काँग्रेसच्या संतोष दसपुते यांच्याकडून त्यांचा अवघ्या दीड हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. पण ते खचले नाहीत. उलट अत्यल्प मतांनी पराभव झाल्याने थोडा जोर लावला तर आमदारकी निघू शकते असा विश्वास त्यांना आला. याच जोरावर 1990 मध्ये काँग्रेसच्या रंगनाथ पाटील यांचा 25 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव करत दानवे पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून दानवे यांच्या याच विजयाचा अश्वमेघ सुरु झाला तो झालाच. 1995 साली ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले. यानंतर 1999 पासून सलग पाच वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या जागेवर विठ्ठलराव सपकाळ हे भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले.

अमित देशमुखांना ‘देवघरातूनच’ आव्हान? अर्चना पाटील चाकूरकर टफ ठरणार?

मात्र 2003 मध्ये आमदार सपकाळ यांचे निधन झाले आणि पोटनिवडणूक लागली. त्यावेळी भाजपचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र चंद्रकांत दानवे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात होते. खरंतर अप्रत्यक्षपणे ही लढत पुंडलिकराव दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यात होती. तेव्हापासूनच दोन्ही दानवे राजकीयदृष्ट्या कायमच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. 2004 आणि 2009 मध्येही चंद्रकांत दानवे यांनीच मैदान मारले. मात्र या तिन्ही निवडणुकीत त्यांचे मताधिक्य कमालीचे घटले. 2003 मध्ये चंद्रकांत दानवे यांचा 16 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला होता. तर 2004 मध्ये त्यांचे मताधिक्य अवघ्या तीन हजार 119 मतांवर आले. 2009 मध्ये रावसाहेब दानवे यांनी पत्नी निर्मला दानवे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले. यात चंद्रकांत दानवे यांचा अवघ्या दीड हजार मतांनी निसटता विजय झाला.

2014 मध्ये भोकरदन विधासभा मतदारसंघातून भाजपने रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना रिंगणात उतरवले. त्यावेळी संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे असा सामना रंगला. या लढतीत संतोष दानवे यांचा सहा हजार 750 मतांनी विजय झाला. 2014 च्या सुरुवातीच्या काळात रावसाहेब दानवे आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बेबनाव होता. त्यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. याचा फायदा भाजपला झाला. संतोष दानवे यांच्या विरोधातील मतदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेत विभागले गेले. 2019 मध्ये संतोष दानवे यांनी तब्बल 32 हजार मतांनी विधानसभा गाठली.

यंदा लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांना 862 मतांची निसटती आघाडी आहे. त्यामुळे चार्ज झालेल्या महाविकास आघाडीतही उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. काही इच्छुक उमेदवार यावेळेस चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी देऊ नये असे सांगत त्यांच्या मागील पाच निवडणुकांतील मतांची गोळाबेरीज मांडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांनी भर मेळाव्यात उमेदवारीवर दावा केला आहे. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजा भाऊ देशमुख हेही या जागेसाठी आग्रही आहेत.

Ground Zero : आष्टीत धस, धोंडे अन् आजबेंनाही ‘जरांगे फॅक्टर’चा धसका!

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, मराठा आरक्षणामुळे अस्थिर झालेला मराठा मतदार, दुरावलेला मुस्लीम मतदार अशा फॅक्टरचा फटका भाजपला बसला. हेच वातावरण विधानसभेलाही कायम राहिल्यास संतोष दानवे यांच्यासाठी आव्हान ठरू शकते. याशिवाय दानवे यांनी सिंचन, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सोयी सुविधांचा विकास मतदारसंघात न केल्याचा प्रचार महाविकास आघाडीकडून केला जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना, रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री असतानाही एखादा मोठा प्रकल्प ते या मतदारसंघात आणू शकलेले नाहीत, असाही आरोप विरोधकांकडून केला जातो.

मात्र निवडणुकीच्या राजकारणात तरबेज मानले जाणारे रावसाहेब दानवे यावेळेसही संतोष दानवे यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात शंका नाही. रामेश्वर सहकारी साखर कारखाना सुरुवातीपासून खासदार रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली आहे. भोकरदन आणि जाफराबाद या दोन्ही पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात होत्या. त्यामुळे खासदारकी वजा झाली असली तरी दानवे मतदारसंघात आपली ताकद टिकवून आहेत. शिवाय जी आघाडी काँग्रेसला मिळाली आहे ती भोकरदन तालुक्यातून नाही तर जाफराबाद तालुक्यातून आहे. त्यामुळे शेजारच्या तालुक्यात थोडा जोर लावला तर आमदारकी वाचू शकते, असा त्यांचा कयास असावा.

follow us