अमित देशमुखांना ‘देवघरातूनच’ आव्हान? अर्चना पाटील चाकूरकर टफ ठरणार?
“सत्ताधाऱ्यांनी अनेक घरे फोडली. या फोडाफोडीला लातूर अपवाद ठरेल असे वाटले होते. पण ‘देवघर’ फुटले. मात्र या देवघरातील ‘देव’ आपल्या सोबत आहे”. काँग्रेसचे (Congress) नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांचे हे वक्तव्य लातूरबाहेरील (Latur) अनेकांना लक्षात आलेले नाही. पण लातूरवासियांसाठी देवघर फुटल्याची गोष्ट नवीन नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानाचे नाव ‘देवघर’ आहे. याच देवघरातील पाटील यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आता आगामी विधानसभा निवडणुकीत लातूर शहर मतदारसंघातून अर्चना पाटील चाकूरकर या अमित देशमुख यांना आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. या आव्हानात शिवराज पाटील चाकूरकर यांची भूमिका महत्वाची असणार आहे. ते काँग्रेसच्या आणि देशमुख यांच्या बाजूने उभे राहणार की सुनेच्या बाजूने उभे राहणार, हा सस्पेन्स लातूरमध्ये कायम आहे. हे चित्र स्पष्ट करत देशमुख यांनी देवघरातील देव अर्थात शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेससोबतच आहेत असे म्हंटले आहे. (Election will be held between Amit Deshmukh of Congress and Archana Patil Chakurkar of BJP in Latur City Assembly Constituency)
पण लातूरच्या राजकारणात देव आणि देवघर एवढे महत्वाचा का आहे? तेच आपण लेट्सअप ग्राऊंड झिरो या स्पेशल सिरीजमध्ये समजून घेणार आहोत.
लातूरवर परंपरागत पकड असलेल्या देशमुख यांना या ‘देवाची’ आठवण का झाली असावी? हा खरा प्रश्न आहे. 1967 आणि 1995 हे दोन अपवाद वगळता लातूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने कधीच पराभव पाहिलेला नाही. 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला लोकसभेला पराभव सहन करावा लागला, पण त्याचीही भरपाई 2024 मध्ये झाली आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर तर अमित देशमुख मराठवाड्यात काँग्रेसचे क्रमांक एकचे नेते मानले जाऊ लागले आहेत. तरीही देशमुख यांना देवाची काळजी घ्यावी लागते. यामागे कारणही तसेच आहे.
लातूर आणि विलासराव देशमुख राज्याला माहिती आहे. बाभळगावच्या सरपंचपदापासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत भरारी घेतलेल्या देशमुखांनी राजकारणातील पहिले धडे हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे बोट धरुनच गिरवले. या दोन नेत्यांमध्ये कधी कधी विसंवादही झाला. याच विसंवादातून 1995 साली विलासराव देशमुख यांचा पराभव झाला. या पराभवमागे लिंगायत मतांवर प्रभाव असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचा हात असल्याची चर्चा अजूनही होत असते. त्याचे उट्टे देशमुख समर्थकांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटील यांचा पराभव करुन काढले.
चिमणराव पाटील ठाकरेंच्या हिटलिस्टवर; गेम करण्यासाठी शिवसैनिकही तयार!
विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील चाकुरकर हे दोघे तसे एकमेकांविषयी आदर असलेले नेते. त्यामुळे ज्या घडामोडी घडल्या त्या साऱ्या पडद्यामागे घडल्या. देशमुख किंवा पाटील या दोघांनीही एकमेकांच्या विरोधात कधीही थेट भूमिका घेतली नाही. मधल्या काळात विलासराव देशमुख यांचे निधन झाले. शिवराज पाटील चाकूरकर सक्रिय राजकारणातून बाजूला झाले. विलासरावांच्या जागी त्यांचे पुत्र अमित देशमुख यांचे नेतृत्व पुढे आहे. ते तीनवेळा आमदार झाले, मंत्रीही झाले. आता याच पाटील कुटुंबातील स्नुषा अमित देशमुख यांच्याविरोधात भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळेच आतापर्यंत देशमुख विरुद्ध पाटील असा उघडपणे कधीही न झालेला सामना या निवडणुकीच्या निमित्ताने लातूरमध्ये पाहायला मिळू शकतो.
लातूर शहर मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या मतांवरती आजही शिवराज पाटील यांचा प्रभाव कायम आहे. लिंगायत समाज नाराज होऊ नये म्हणून देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीत योग्य ती काळजी घेतली होती. लिंगायत समाजातीलच डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडूनही आणले. आता विधानसभेच्या नवीन समीकरणात लिंगायत समाजाची मते अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडे जाणार की अमित देशमुख यांच्याकडे वळणार यावर विधानसभेची गणिते अवलंबून असणार आहेत.
Ground Zero : तीन पराभवांचा वचपा बाकी… ‘शशिकांत शिंदे’ उसळी मारणार?
आता प्रश्न उरतो तो अर्चना पाटील चाकूरकर या अमित देशमुख यांना टफ फाईट देणार का? पाटील यांच्यासाठी भाजपची वाढलेली ताकद ही जमेची बाजू आहे. भाजपच्या खासदारकीच्या गत दोन टर्ममध्ये झालेली कामे, महापालिकेने केलेली कामे ही त्यांची शिदोरी आहे. शिवाय शिवराज पाटील चाकूरकर यांचे नेटवर्कही अर्चना यांच्यासाठी फायद्याचे ठरु शकते. शिवराज पाटील चाकूरकर यांना मानणारा लातूरमध्ये आजही मोठा गट आहे. महापालिका असो, जिल्हा परिषद असो की अन्य संस्था असो. चाकूरकर यांचा गट नेहमी सक्रिय असतो. शहराच्या राजकारणात चाकूरकर स्वतः लक्ष ठेवून असतात. त्यामुळे यंदा सामना टफ होईल यात शंका नाही. यात आता कोण बाजी मारते आणि शिवराज पाटील चाकूरकर कोणाच्या बाजूने उभे राहतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.