Ground Zero : तीन पराभवांचा वचपा बाकी… ‘शशिकांत शिंदे’ उसळी मारणार?
2019 मध्ये विधानसभेला, 2021 मध्ये जिल्हा बँकेला आणि 2024 मध्ये लोकसभेला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी मागच्या पाच वर्षात तीन पराभव बघितले, पचवले आणि उभे राहिले. 2024 च्या विधान सभा निवडणुकीला ते पुन्हा एकदा कोरेगाव मतदारसंघातून निवडणूक (Koregaon Assembly Constituency) लढण्यास सज्ज झाले आहेत. “आपण विधानसभेची निवडणूक लढणार आणि ती देखील कोरेगावमधूनच लढणार” असे म्हणत त्यांनी शड्डू ठोकला आहे. यंदाही त्यांच्यापुढे शिवसेनेच्या बलाढ्य महेश शिंदे यांचेच आव्हान असणार आहे. या आव्हानात कोण वरचढ ठरु शकते आणि कोण बाजी मारु शकते? (From Koregaon Assembly Constituency, NCP’s Shashikant Shinde may fight against Shiv Sena’s Mahesh Shinde)
पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधून…
खरंतर शशिकांत शिंदे यांचे मूळ गाव जावळी तालुक्यातील हुमगाव. कोरेगाव हा काही त्यांचा हक्काचा मतदारसंघ नव्हता. माथाडी कामगारांचे नेते असलेले शशिकांत शिंदे 1999 आणि 2004 मध्ये जावळीतूनच आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 मध्ये जावळी मतदारसंघ सातारा विधानसभेला जोडण्यात आला. तिथे राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले आमदार होते. त्यामुळे शरद पवारांनी शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघातून तिकीट दिले. त्यावेळी कोरेगावमधून राष्ट्रवादीच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि त्यावेळच्या महसूल मंत्री शालिनीताई पाटील आमदार होत्या. आपले तिकीट कापून शिंदेंना दिल्याने शालिनीताई चिडल्या आणि त्यांनी बंडखोरी केली.
पण शशिकांत शिंदे यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. दोनवेळा निवडून आलेल्या शालिनीताईंचा शिंदेंनी तब्बल 31 हजार मतांनी पराभव केला. पुढे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले. 2014 मध्ये तर शिंदे यांचा 42 हजारांच्या मताधिक्क्याने विजय झाला. शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघ अक्षरशः घरच्यासारखा बांधला. पण याच दरम्यान खटावचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि उद्योजक महेश शिंदे कोरेगावमधून बांधणी करत होते. महिला, तरुण, ज्येष्ठ या सगळ्या वर्गाशी जुळवून घेत जनसंपर्क वाढवत होते. 2014 पासून महेश शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आले. त्यांनी मतदारसंघ बांधणीत भाजपच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नियमित संपर्कात असत.
पृथ्वीराज चव्हाण डेंजर झोनमध्ये… ‘कराड दक्षिणला’ अतुल भोसलेंनी ओढत आणलंय…
2014 ते 2019 या काळात महेश शिंदे यांनी कोरेगावमध्ये जोरदार तयारी केली. मतदारसंघ ऐनवेळी शिवसेनेला सुटूनही ते डगमगले नाहीत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत धुरळा उडवून दिला. एकतर्फी वाटणारी निवडणूक शशिकांत शिंदे यांना पहिल्यांदाच जड वाटू लागली. प्रचाराचे दिवस संपत जाईल तसे ते टेन्शनमध्ये येऊ लागले. सुरुवातीला काहीसे गाफील राहिलेले शशिकांत शिंदे अंतिम टप्प्यात सावध झाले. पण सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक त्याचवेळी असल्याने शशिकांत शिंदे तिकडे अडकले. याच परिस्थितीचा फायदा घेत महेश शिंदे सहा हजार मतांनी विजयी झाले. तिथून महेश शिंदे यांनी मागे वळून बघितलेच नाही.
कोरेगावची नगरपंचायत त्यांनी 13-4 अशी एकतर्फी मारली. तालुक्यातील ग्रामपंचायतींवरही त्यांचेच वर्चस्व तयार केले. शशिकांत शिंदेंचा गट उबदारी येणारच नाही याची काळजी महेश शिंदे यांनी घेतली. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदार शिंदे यांना पाच वर्षांत भरपूर ताकद दिली, कोरेगावसाठी कोट्यावधींचा निधी दिला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडूनही निधीचा ओघ सतत सुरुच असतो. मतदारसंघात मागच्या पाच वर्षांमध्ये एक हजार कोटींहून अधिक निधी आणल्याचा दावा आमदार शिंदे आणि त्यांचे समर्थक करतात. शिवाय मुख्यमंत्र्यांनी महेश शिंदे यांना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष देत राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. एमआयडीसी माण की कोरेगाव या वादात मुख्यमंत्री शिंदे यांनी महेश शिंदे यांनाच पसंती देत कोरेगावला ग्रीन सिग्नल दिला.
ठाकरेंचा राग, पाटणकरांची ताकद… यंदा शंभुराज देसाईंचं काही खरं नाही….
या दरम्यान, शशिकांत शिंदे यांनाही शरद पवार यांनी विधान परिषदेवर संधी देत ताकद देण्याचा प्रयत्न केला. पण 2021 मध्ये ज्ञानदेव रांजणे यांच्याकडून त्यांचा जिल्हा बँकेला पराभव झाला. पाठोपाठ लोकसभेलाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा निवडणुकीत त्यांचा बरोबर तेवढ्याच मतांनी पराभव झाला जेवढा 2019 मध्ये विधानसभेला झाला होता. म्हणजेच सहा हजार मतांचा फरक शशिकांत शिंदे यांना अजूनही भरुन काढता आलेला नाही. पण राष्ट्रवादी आणि शशिकांत शिंदे यांचा परंपरागत मतदार ही त्यांची जमेची बाजू आहे. शिवाय शरद पवार यांच्याबाजूने असलेली सहानुभूतीही शिंदेंच्या जोडीला आहे. त्यामुळे कोरेगावची लढाई तुल्यबळ होणार हे तर नक्की आहे. पण दोन निवडणुकीत राहिलेला सहा हजार मतांचा फरक शशिकांत शिंदे कसा भरुन काढतात हे बघणे महत्वपूर्ण ठरणार आहे.