Download App

Ground Zero : थोरात-कोल्हेंनी कितीही जोर लावला तरी ‘विखे पाटलांचा’ किल्ला अभेद्यच!

  • Written By: Last Updated:

सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) संपूर्ण राज्यात आणि अहमदनगरच्या आजवरच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक गाजलेली ही लढत. यात विखेंच्या साम्राज्याला हात्रेत निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मैदान मारलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्यांचा डोळा शिर्डी विधानसभा मतदारसंघावर (Shirdi Assembly Constituency) आहे. (Will there be a fight between BJP’s Radhakrishna Vikhe Patil and Prabhavati Ghogare of Mahavikas Aghadi in Shirdi Assembly Constituency)

राधाकृष्ण विखे यांना राजकीय धक्का कसा देता येईल याचे आडाखे विरोधक बांधून आहेत. या मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव करून त्यांना नगरचा राजकारणात उभचं राहू द्यायचं नाही अशी रणनीती असल्याचं बोललं जातं. परंतु विखे हे सलग सातवेळा मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे त्यांना पराभूत करणे वाटते तितके सोपे काम नक्कीच नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या या रणनीतीला कितपत यश येऊ शकते? आणि या लढाईत हा विकास आघाडीचा चेहरा कोण असणार?

हेच बघूया लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या विशेष सिरीजमधून….

1978 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला. कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील काही गावे मिळून हा मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले ते काँग्रेसचे लोणीचे चंद्रभान घोगरे पाटील. घोगरे पाटील हे सहकारातील मोठे नाव होते. आमदार होण्यापूर्वी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जोडीने त्यांनी प्रवरा सहकारी कारखान्याचे मुहूर्तमेढ रोवली होती. लोणी खुर्दचे सरपंच, जिल्हा बँकेचे संचालक, प्रवरा साखर कारखान्याचे संचालक ते चेअरमन, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त ते राहिलेले आहेत. त्यानंतर ते विधानसभा लढले नाहीत. ते सहकारामध्ये कार्यरत राहिले.

त्यानंतर स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांचे मावस भाऊ अण्णासाहेब म्हस्के हे तीन टर्म या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार राहिले. 1980, 1985, 1990 असे तीनवेळा ते निवडून आले होते. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते जलसंपदा मंत्री होते. पण 1995 ला अण्णासाहेब म्हस्के यांनी हा मतदारसंघ राधाकृष्ण विखे यांच्यासाठी सोडला. 1995 ला राधाकृष्ण विखे या मतदारसंघातून सहज निवडून आले. तेव्हापासून आजतागायत तेच या मतदारसंघाचे आमदार आहेत. या संपूर्ण कार्यकाळात ते कधी मंत्री राहिले तर कधी विरोधी पक्ष नेते झाले.

या काळात विखे यांना आजवर अवघड कोणती निवडणूक राहिली असेल तर 2009 मधील. त्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांच्यासमोर शिवसेनेने डॉ. राजेंद्र पिपाडा यांना मैदानात उतरविले होते. दोघांमध्ये फाइट झाली. त्यावेळी विखे हे तेरा हजारांहून अधिक मते घेऊन विजयी झाले. विखे यांना 80,301 मते मिळाली होती. तर पिपाडा यांना तब्बल 66 हजार 992 मते मिळाली होती. पहिल्यांदाच विखेंचे मताधिक्य कमी झाले होते. बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी हे मताधिक्य घटविण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांना विरोधकांना मदत केली, असा आरोप विखे यांच्याकडून होत होता. त्यामुळे विखे-थोरात संघर्ष अधिकच तीव्र झाला.

या संघर्षात विखे यांनी संगमनेरमधील आपल्या मतदारसंघाला जोडलेल्या गावांमधील ग्रामपंचायत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2014 ला राधाकृष्ण विखे हे एक लाख 21 हजार 459 मते घेऊन सहज विजयी झाले. त्यावेळी शिवसेनेचे अभय शेळके यांना 46 हजार 797 मते मिळाली होती. तर भाजपचे राजेंद्र गोंदकर यांना 17 हजार 283 मते मिळाली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांच्याविरोधात कुणीही तगडा उमेदवार नव्हता. या निवडणुकीत विखे पाटील यांनी एक लाख 32 हजार 316 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या सुरेश जगन्नाथ थोरात यांना 45 हजार 269 मते मिळविली. तब्बल 87 हजार मताधिक्यांनी विखे पाटील यांनी मोठा विजय मिळविला. पण राज्यातील राजकीय गणिते बदलली. उद्धव ठाकरे हे आघाडीत गेले आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. अडीच वर्षींनी सत्तेत आलेल्या शिंदे सरकारमध्ये विखे यांना महसूलमंत्री असे तगडे खाते आणि नगरचे पालकमंत्रीपद मिळाले विखेंनी पुन्हा जिल्ह्यात वर्चस्व निर्माण केले.

पण मागच्या वर्षभरापासून विखेंच्या साम्राज्याला हादरे बसायला सुरुवात झाली. गणेश कारखाना निवडणुकीत विवेक कोल्हे आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येत कारखाना विखेंच्या ताब्यातून हिसकावला. लोकसभेला सुजय विखे हे अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झाले. शिर्डीत शिवसेनेच सदाशिव लोखंडे तिसऱ्या टर्मला पराभूत झाले. शिर्डी मतदारसंघातूनही लोखंडे यांना कमी मताधिक्य मिळाले. याची सल देखील लोखंडे यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यानंतर आता विधानसभेला काही दगाफटका नको म्हणून विखेंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्वतः मंत्री विखे, मुलगी सुजय विखे, पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, सून हे सर्वच मतदारसंघात सक्रीय झालेत. विविध विकासकामांचे उद्घाटन सुरू आहेत.

विखेंविरोधात उमेदवार कोण?

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण ही चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. महाविकास आघाडीकडून विखेंविरोधात राळ उठविणाऱ्या प्रभावती घोगरे यांनी निवडणुकीची तयार सुरू केली आहे. त्या शिर्डीचे मतदारसंघाचे पहिले आमदार चंद्रभान घोगरे यांच्या सूनबाई आहेत. विखे हे लोणी बुद्रुकचे आहेत. तर घोगरे या लोणी खुर्दच्या आहेत. येथील ग्रामपंचायत घोगरे यांच्या ताब्यात आहेत. विखे यांना या ग्रामपंचायती गेल्या दहा वर्षांपासून ताब्यात घेता आलेली नाही. तर लोकसभेला त्यांनी थेट दक्षिणेत येऊन विखेंविरोधात प्रचार करत होत्या. शिर्डीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून उमेदवारी मागत आहेत.

गतवेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला गेला होता. त्यामुळे यंदाही काँग्रेस या मतदारसंघावर दावा ठोकू शकते. उद्धव ठाकरे यांना उत्तरेत विधानसभा मतदारसंघ नाही. त्यामुळे हा मतदारसंघ ठाकरे मागत आहेत. विखे यांचे कट्टर विरोधक राजेंद्र पिपाडा हे निवडणुकीत रिंगणात उतरण्याचे प्रयत्न करत आहेत. ते सध्या भाजपमध्ये आहेत. ते महाविकास आघाडीत येण्यासाठी चाचपणी करत आहेत. ते मध्यंतरी ते शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. पण भेट होऊ शकली नाही.

सहकारी संस्था, ग्रामपंचायती, साखर कारखाना, निळवंडे कालव्याचे कामे व इतर विकासकामांमुळे विखेंचा बालेकिल्ला उध्वस्त करणे अवघड आहे. पण गणेश कारखान्याच्या भागातील तीस गावांत कोल्हे यांनी तयार केलेले आपले वर्चस्व आणि आश्वीपट्टातील ग्रामपंचायती विखेंच्या ताब्यात असले तरी येथे काही प्रमाणात बाळासाहेब थोरातांची ताकद आहेत. गणेश साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आणि आश्वीपट्टीतील गावेही हे विखेंसाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे थोरात व कोल्हे हे मिळून हे विखेंना कोंडीत पकडण्यासाठी कोण उमेदवार देतात, रसद कशी पुरवतात की आता काही दिवसांत समोर येईलच.

follow us