वडील एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde), मुलगा उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) आणि मुलगी भाजपमध्ये (BJP). एकाच घरात तीन पत्र अशी अवस्था सध्या माजी मंत्री, पाच टर्म आमदार राहिलेल्या बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांच्या कुटुंबांची झालीय. एकेकाळी नाशिक (Nashik) शिवसेनेचा बालेकिल्ला होता. नाशिकमधील देवळाली मतदारसंघात बबनराव घोलप यांचे राजकीय साम्राज्य होते. पण गत विधानसभेला घोलप यांचा मुलगा योगेश यांचा पराभव झाला आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दाला उतरती कळा लागली. त्यानंतर लोकसभेसाठी बबनराव घोलप उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
आता देवळाली मतदारसंघातून घोलप यांची दोन्ही मुले एकमेकांविरोधात दोन हात करण्यास तयार आहेत. यात मुलाला तिकीटासाठी अनुकूल स्थिती आहे, पण मुलीला तिकीटासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यांना महायुतीत राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. ही सर्व राजकीय परिस्थिती बघता येथील यंदाची निवडणूकही चुरशीची होणार हे नक्की. याच पार्श्वभूमीवर यंदा देवळाली मतदारसंघ महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणाच्या वाट्याला जाऊ शकतो? आणि कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते? (Will there be a fight between Mahavikas Aghadi’s Yogesh Gholap and NCP’s Saroj Ahire in Deolali Assembly Constituency)
1978 साली देवळाली मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत बाबूलाल सोनाजी अहिरे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. 1980 मध्ये काँग्रेस संयुक्त गटाकडून पुन्हा बाबूलाल अहिरे विजयी झाले. 1985 मध्ये भिकाचंद हरिभाऊ धोंडे भाजपचे आमदार झाले. त्यानंतर या मात्र या मतदारसंघात बबनराव घोलप यांचा उदय झाला. शिवसेनेसाठी झटून काम करणाऱ्या बबनराव घोलप यांना 1990 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मैदानात उतरविले. घोलप यांना 53 हजार 400 मते मिळाली. त्यांनी अपक्ष रामदास सदाफुले यांचा पराभव केला.
1995 मध्ये दुसऱ्या वेळेस बबनराव घोलप हे 78 हजार मते घेऊन विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या विश्वनाथ काळे यांचा पराभव केला. काळे अवघी 41 हजार मतेच घेऊ शकले. सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले बबनराव घोलप हे युती सरकारमध्ये मंत्री झाले. त्यांच्याकडे समाज कल्याण विभाग देण्यात आला. परंतु ज्येष्ठ समाजासेवक अण्णा हजारे यांनी घोलप यांच्या खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्याकडे त्याबाबत पुरावेही होते. त्यामुळे घोलपांना मंत्रिपद सोडावे लागले. 1999 ला भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने शिवसेनेने घोलप यांचे तिकीट कापले. पण अपक्ष उभे राहत ते निवडून आले आणि ते पुन्हा शिवसेनेत गेले.
2004 आणि 2009 ला घोलप यांचाच बोलबाला राहिला. 2004 ला राष्ट्रवादीच्या रामदास सदाफुले यांनी त्यांना फाइट दिली. सदाफुले यांना 79 हजार 695 मते मिळाली होती. तर बबनराव घोलप यांना 85 हजार 297 मते मिळाली होती.
2009 ला शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यापासून या मतदारसंघातून लढण्याचे घोलप यांचे मनसुबे होते. 2014 मध्ये त्यांच्यासाठी तशी संधी चालून आली. ऐनवेळी भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. शिवसेनेकडून घोलप यांना उमेदवारी मिळाली. ते निवडणुकीच्या तयारी लागले. पण भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात बबनराव घोलप व त्यांच्या पत्नी यांना मुंबई उच्च न्यायालायने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर शिवसेनेने त्यांची उमेदवारी रद्द केली आणि सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली.
2014 ला मुलगा योगेश घोलपची राजकारणात एन्ट्री झाली. त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले. योगेश घोलप हेही 49 हजार 751 मते घेऊन विजयी झाली. त्यांनी भाजपचे रामदास सदाफुले यांचा पराभव केला. तेही दुप्पट मतांनी. सदाफुले यांना 21 हजार 580 मते मिळाली होती. परंतु दुसऱ्या टर्मला योगेश घोलप यांना मोठा पराभव सहन करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरोज अहिरे यांनी घोलप यांचा तब्बल दुप्पट मतांनी पराभव केला. अहिरे यांनी 84 हजार 326 मते घेतली. तर घोलप यांना अवघी 42 हजार 624 मते मिळाली होती. सलग तीस वर्षे मतदारसंघावर एकहाती वर्चस्व असलेल्या घोलप यांना हा मोठा धक्का होता.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर बबनराव घोलप उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटात गेल्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते शिर्डीतून पुन्हा इच्छुक होते. त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा पक्षात घेण्यास विरोध केला. उमेदवारीसाठी ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. शेवटी ठाकरेंची साथ सोडत घोलप हे शिंदे गेले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. लोकसभा निवडणुकीतही घोलप यांचा शिंदे यांना फायदा झाला नाही. कारण त्यांच्या देवळाली मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना तब्बल 27 हजार मतांची लीड मिळाले. आमदार सरोज अहिरे, माजी आमदार बबनराव घोलप अशी ताकद असताना गोडसे यांना या मतदासंघातून आघाडी घेता आली नाही.
आता बबनराव घोलप हे शिवसेनेत आहेत. तर मुलगा योगेश घोलप यांनी अद्याप ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. मुलगी तनुजा घोलप-भोईर या सध्या भाजपमध्ये असून, त्या मतदारसंघातून तयारी करत आहेत. म्हणजे घोलप घरातील तिघेही वेगवेगळ्या पक्षात आहेत. बबनराव घोलप यांची दुसरी कन्या नयना घोलप या नाशिकच्या महापौर राहिलेल्या आहेत. परंतु त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही.
ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा या सुत्रानुसार महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला जाऊ शकते. पण भाजपकडून दावेदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरून रस्सीखेच होणार आहे. तर माजी आमदार योगेश घोलप हे ठाकरे गटाकडून उमेदवारी मागत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येतील, असे बोलले जात होते. परंतु तसे काही झाले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सरोज अहिरे या प्रबळ दावेदार आहेत. तर उद्धव ठाकरे गटाकडून योगेश घोलप हे दावेदार आहेत. भाजपकडून देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रीतम आढावा आणि तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीची तयारी करणाऱ्या राजश्री अहिरराव याही इच्छुक आहेत.
इकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे अक्षरश: उमेदवारीसाठी रांग लागली आहे. जिल्हाध्यक्षांकडे तब्बल तीस जणांनी उमेदवारी मागितली आहे. लक्ष्मण मंडाले, दीपक वाघ, नितीन मोहिते, संजय कुऱ्हाडे, सुवर्णा दोंदे हे प्रबळ दावेदार आहेत. महाविकास आघाडीत ही जागा कुणाला जाईल? यावर लढत निश्चित होईल. जागा शरद पवार यांच्याकडे गेल्यास योगेश घोलपही तुतारी हाती घेऊ शकतात. तर ठाकरे गटाला गेल्यासही योगेश घोलप किंवा भाजपचा उमेदवार आयात करून रिंगणात उतरविले जाऊ शकतात. सध्याचे राजकारण बघता काही अपक्ष रिंगणात उतरतील. त्यात योगेश घोलप विरुद्ध तनुजा घोलप हे दोघे भाऊ बहिण एकमेंकाविरोधात शड्डू ठोकतील. त्यामुळे यंदा देवळालीची विधानसभा निवडणूक सहज आणि सरळ नसणार हे नक्की.