Download App

Ground Zero : शिवाजीराव कर्डिलेंसाठी अजितदादांची फिल्डिंग… तनपुरेंची ‘विकेट’ पडणार?

राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार?

  • Written By: Last Updated:

लोकसभा निवडणूक निकाल लागून एक आठवडाच झाला होता. राज्यात अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेगाने हाचलाची सुरु होत्या. अशात अहमदनगरच्या (Ahmednagar) दृष्टीने एक मोठी राजकीय घडामोड मुंबईत घडली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि भाजप (BJP) नेते शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. राहुरीमधील बंद पडलेला तनपुरे साखर कारखाना अजित पवार यांनी चालविण्यासाठी घ्यावा, यासाठी ही भेट असल्याचे कर्डिलेंनी सांगितले आहे.

वर वर पाहता हे सत्य वाटेल असेच होते. पण या भेटीमागे होती आगामी विधानसभा निवडणुकीची खलबत… याच बैठकीमध्ये ठरली राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांना पाडण्याची रणनीती. याच बैठकीनंतर सुरु झाली शिवाजीराव कर्डिले राष्ट्रवादीच्या चिन्हावर राहुरी मतदारसंघात उभे राहणार असल्याची चर्चा. लोकसभेची निवडणूक संपताच अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत थांबलेल्या आमदारांना पाडण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. त्याच फिल्डिंगमधून ही भेट झाल्याचे बोलले जाऊ लागले. (Will there be a fight between Shivajirao Kardile and Prajakt Tanpure from Rahuri Assembly Constituency?)

लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहू, अजित पवार यांनी नेमकी कशी फिल्डिंग लावलीय?

2009 ला मतदारसंघाच्या पुनर्रचनेत राहुरी, नगर तालुक्यातील काही गावे आणि पाथर्डी तालुक्यातील काही गावे मिळून राहुरी विधानसभा मतदारसंघ तयार झाला. शिवाजी कर्डिले यांचा हक्काचा असलेला नगर-नेवासा मतदारसंघच गायब झाला होता. त्यामुळे त्यांची कमालीची गोची झाली. पण या पहिलवान गड्याने हार न मानली नाही. कर्डिलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढविली. पण त्यात त्याचा पराभव झाला. त्यानंतर कर्डिले भाजपमध्ये गेले आणि आमदारकीचे तिकीटही मिळविले.

नवीन मतदारसंघ असतानाही तिरंगी लढतीत कर्डिले यांनी बाजी मारली. त्यात शिवाजी कर्डिले यांना 57 हजार मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या प्रसाद तनपुरे यांना 49 हजार मते मिळाली. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर मैदानात उतरलेल्या शिवाजी गाडे यांनी 42 हजारांहून मते घेतली होती. हीच मतांची फाटाफूट कर्डिले यांच्या पथ्यावर पडली. 2014 मध्ये महायुती आणि आघाडी हे स्वतंत्रपणे लढले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने तनपुरे यांना तिकीट नाकारले. शिवाजीराव गाडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे तनपुरे कुटुंब राष्ट्रवादीवर नाराज झाले. तेव्हा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या वादातून तनपुरेंचे तिकीट कापल्याचे आजही बोलले जाते. त्यातून जयंत पाटील यांच्या बहिण डॉ. उषा तनपुरे यांनी धनुष्यबाण हाती घेतले.

अमृता पवारांचं चॅलेंज, माणिकराव शिंदेंही मैदानात… भुजबळांसाठी ‘येवला’ अवघड?

परंतु तिरंगी लढतीत तनपुरेंचा पराभव झाला. कर्डिलेंनी 91 हजार मते घेतली तर तनपुरे यांना 65 हजारांवरच समाधान मानावे लागले. अजितदादांनी हट्टाने ज्या शिवाजी गाडे यांना तिकीट दिले ते अवघी 24 हजार मतेच घेऊ शकले. 2019 ला शिवाजी कर्डिलेंविरोधात प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले. दुरंगी लढतीत मतविभागणीला खो बसाला आणि याचा थेट फायदा तनपुरेंना झाला. त्यांनी कर्डिले यांचा 23 हजार 326 मतांनी पराभव केला. कर्डिले यांना नगर तालुक्यातील हक्काची गावे आणि पाथर्डीतील करंजी गटावर मोठा विश्वास होता. पण येथील काही स्थानिक नाराज कर्डिले यांचे कार्यकर्ते हे तनपुरेंना जावून मिळाले होते. त्यातून एकगठ्ठा मतदान कर्डिलेंना मिळू शकले नाहीत. त्याचाही त्यांना फटका बसला.

आता यंदाही राहुरीमधून पुन्हा शिवाजीराव कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे अशीच लढत होणार हे स्पष्ट आहे. यात तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील. पण शिवाजीराव कर्डिले भाजपकडून की राष्ट्रवादीकडून हे अद्याप फिक्स नाही. पण मध्यंतरी कर्डिले अजित पवार यांना भेटले होते. बंद पडलेला राहुरी साखर कारखाना अजित पवार यांनी चालविण्यासाठी घ्यावा, यासाठी ही भेट असल्याचे कर्डिले यांनी सांगितले होते. परंतु या भेटीमागे वेगळेच राजकारण आहे. गत लोकसभेला सुजय विखे यांना 72 हजारांचे मताधिक्य होते. यंदा हे मताधिक्य थेट 11 हजारांवर घसरले आहे. त्यामुळे कर्डिले काहीसे अस्वस्थ झाले आहेत. त्यातच या मतदारसंघात ऊस उत्पादक, दूध उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत.

काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यात दोन धर्मात तणाव निर्माण झाला होता. त्यातून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रक्षोपक भाषण केली होती. यामुळे मुस्लिम मते दुरावण्याची कर्डिलेंना भीती आहे. या सगळ्यामुळे येथे भाजपला फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे. त्यातूनच हा मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे मागून कर्डिले घड्याळावर लढतील, असे बोलले जाते. तनपुरे यांना फाईट देण्यासाठी अजितदादाही या बदलासाठी तयार असल्याची माहिती आहे. मध्यंतरी सुजय विखे यांनी एक बॉम्ब फोडला होता. ते म्हणजे संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा. पण कर्डिले यांचासारखा तगडा उमेदवार असताना भाजप दुसरा उमेदवार देऊ शकत नाही, हे त्यांच्याही लक्षात आल्याने त्यांनी आपली तलावर म्यान करत कर्डिलेंसाठीच काम करण्याचा शब्द दिला आहे.

Ground Zero : शरद पवारांचा डोळा फडणवीसांच्या मोहऱ्यावर… मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंचे नाव?

राहुरीमध्ये 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुकीत झालेल्या मतविभाजनाचा कर्डिलेंना फायदा झाला होता. तर 2019 साली दुरंगी लढत झाल्याचा फायदा तनपुरेंना झाला होता. त्यामुळे एखादा तिसरा 25 हजार मते घेणारा तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरण्याचा विचार भाजपच्या गोटात सुरु असल्याचे सांगितले जाते. इथून माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पूत्र, देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे इच्छुक आहेत. परंतु सत्यजित कदमांचे वर्चस्व असलेली देवळाली प्रवरा नगरपालिका आणि इतर गावे श्रीरामपूर मतदारसंघाला जोडलेली आहेत. तर चंद्रशेखर कदम हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी निगडीत आहेत. त्यामुळे तेही मुलासाठी प्रयत्न करत आहेत. यातील एखाद्या उमेदवाराला उभे करता येईल का याबाबत सध्या चाचपणी सुरु आहे.

तुम्हाला काय वाटते? भाजप, अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या या फिल्डिंगला यश येणार का? कर्डिले पुन्हा आमदार होणार का? की प्राजक्त तनपुरेच दुसऱ्यांदा विधानसभा गाठणार? तुमचे मत आम्हाला नक्की कमेंट करुन सांगा..

follow us