Download App

‘दानवेंचे आरोप अन् लोढांचा अधिवेशनातच राजीनामा’; विधानपरिषदेत हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा

Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज (Winter Session) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. लोढा यांच्या कुटुंबाच्या व्यवसायासंदर्भात दानवे यांनी काही खळबळजनक आरोप केले. त्यावर लोढांचाही पारा चांगलाच वाढला. त्यांनी थेट खिशातून कागद काढत सही करून राजीनामा देण्याची भाषा केली. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच सभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी करत वाद कमी करण्याचा प्रयत्न करत दोघांनाही खोचक टोले लगावले.

लोढांचं नाव घेत दानवेंचे आरोप 

सरकार सर्वसामान्यांचं नाही. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे एक एक प्रकार समोर येत आहेत. मंगलप्रभात लोढा यांच्याबद्दल बोलायचं तर मुंबईत काय सुरू आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात अनेक जमिनी घ्यायच्या. एक भाजपा नेते आणि मुंबईचे पालकमंत्री यांच्याशी संबंधित अवैध ठिकाणी बांधकाम आणि घरांची विक्री सुरू आहे. भाजप उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता.

दानवेंच्या या आरोपावर लोढा चांगलेच संतापले. ते म्हणाले, अंबादास दानवे यांनी माझं नाव घेतलं. नंतर आपण (सभापती) नाव काढण्यास सांगितलं पण तोपर्यंत युट्यूबद्वारे सगळीकडे गेलं आहे. नंतर सांगितलं गेलं की भाजपाचे एक मंत्री, पालकमंत्री पण त्याने देखील माझ्याकडेच निर्देश होतो. मागील दहा वर्षांपासून माझ्या परिवाराच्या व्यवसायात मी नाही. माझ्या परिवाराचा व्यवसाय फक्त मुंबईतच आहे असं नाही तर माझा मुलगा जगभरात काम करतो. कुणी जर कायदेशीर काम करून पैसे कमवत आहे किंवा व्यवसाय करत आहे तर ते चांगल आहे की काही काम न करता आरामात पडून राहणं ते चांगलं आहे. माझ्या परिवाराकडून एकही बेकादेशीर काम जर चालू असेल तर मी माझी राजीनामा कोऱ्या कागदावर सही करून आपल्याकडे देतो.

पुरावे द्या, मी स्वतः घ्यायला येतो 

माझा परिवार व्यवसाय करतो हा गुन्हा आहे का? मी मागील 30 वर्षांपासून विधानसभेचा सदस्य आहे. मी कधीच माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही. परिवारात कुणीच व्यवसाय करायचा नाही का? व्यवसाय करून जर यशस्वी झालं तर त्यातही आक्षेप घ्यायचा. माझी अंबादास दानवे यांना विनंती आहे की पुरावा असेल तर द्या. अन्यथा पूर्ण शहानिशा केल्याशिवाय कुणावरही आरोप करू नका.

एक रुपयाचाही आरोप करू शकत नाही 

यानंतर दानवे म्हणाले, मी त्यांचं नाव मागं घेतलं आहे. जर त्यांचं म्हणणं असेल की पुरावे द्या तर पुरावे देण्याचीही माझी तयारी आहे. त्यावर लोढा म्हणाले, तुम्ही सांगा कधी पुरावे देता मी स्वतः तुमच्याकडे येतो. पण हे सगळं थांबलं पाहिजे हे काय चाललंय. तुम्ही तारीख सांगा मी येतो. माझ्याबरोबर मुंबईतील तीन आमदार येथे बसलेत त्यांनाही विचारा एक इंच तरी बेकायदेशीर काम कुठं चाललं आहे का? मी अत्यंत पारदर्शकपणे काम करतो. माझ्या मंत्रिपदाच्या कामकाजात एक रुपयाचाही कुणी आक्षेप करू शकत नाही, असं आव्हान लोढा यांनी दानवेंना दिलं.

नीलम गोऱ्हेंचे लोढा-दानवेंना खोचक टोले 

यानंतर वाद वाढत असल्याचे लक्षात येताच सभापती नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप केला. खूप वेळा राजीनामा खिशात असतो पण तो कुणी काढून दाखवत नाही. पण, लोढांनी राजीनामा काढून दाखवला. माझ्याकडे राजीनामा देण्याचीही तयारी दाखवली. त्यामुळे तुमच्या  (मंगलप्रभात लोढा) भावना प्रामाणिक आहेत असं वाटतं. आता अंबादास दानवे तुमच्याकडे काही पुरावे आहेत म्हणता. असतीलही. कारण तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. तुम्ही आतापर्यंत इतकी पत्र दाखवली. याचा अर्थ त्या विभागातच तुमचे स्नेही मित्र आहेत की ते तुम्हाला पुरावे देताहेत. भ्रष्टाचारासंदर्भात आपण कायदा केला आहे. सभागृहातही चौकशी होते. खरं तर तुम्ही राजीनाम्याची मागणीही केली नव्हती, असे गोऱ्हे दानवेंना उद्देशून म्हणाल्या.

Tags

follow us