Tuition Fee Waiver for Drought Affected Students : राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत (Education) असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी शिवसेनेतर्फे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. केवळ परीक्षा शुल्क माफ करून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांची ट्युशन फीही माफ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे प्रा. सचिन सानप यांनी दिली. दुष्काळग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने ट्युशन फीची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही त्यांनी केली. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित शैक्षणिक साहित्य आणि दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचे सचिव किरण साळी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुष्काळग्रस्त भागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर, युवासेनेचे सचिव किरण साळी, शहराध्यक्ष निलेश गिरमे, विद्यापीठ अध्यक्ष योगेश बेंद्रे, केंद्रप्रमुख गोरक्ष कांबळे यांच्यासह निलेश खाडे, मंदार गिरमे, अक्षय फूलसुंदर, सागर कडू आणि मयूर जगताप उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते 500 हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी बोलताना सचिन सानप यांनी दुष्काळाच्या तीव्रतेकडे लक्ष वेधले. राज्य सरकारने 310 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात संपूर्ण राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून काही ठिकाणी दोन डब्यांमध्ये तीन विद्यार्थ्यांना जेवण करावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या संकटात विद्यार्थ्यांनीही कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे सानप यांनी नमूद केले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी विद्यार्थ्यांनी भविष्याबाबतची उमेद सोडू नये. प्रत्येक समस्येवर मार्ग निघू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या संपर्कात राहून त्यांना धीर द्यावा. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनीही पालकांची भूमिका पार पाडण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. याशिवाय पुण्यातील विविध भागांतील सुमारे 1,000 गरजू विद्यार्थ्यांना फूड स्कॉलरशिप देण्याचा उपक्रमही शिवसेनेतर्फे राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही दुष्काळग्रस्त नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगितले. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर बनत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार द्यावा. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फराळ आणि शैक्षणिक साहित्य वाटप हा याच सामाजिक बांधिलकीचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्टुडंट हेल्पिंग हँडचे कुलदीप आंबेकर यांनी विद्यार्थ्यांच्या अन्न आणि आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधले. अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर दोन वेळचे जेवण मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून फूड स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात येत असून गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. दुष्काळाच्या संकटात विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि पोषण या दोन्ही बाबींकडे लक्ष देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
