Education : 68 टक्के विद्यार्थी गणितात अन् 21 टक्के मराठीत ‘कच्चे’; ‘असर’च्या अहवालाने भूकंप

Education : 68 टक्के विद्यार्थी गणितात अन् 21 टक्के मराठीत ‘कच्चे’; ‘असर’च्या अहवालाने भूकंप

मुंबई : देशभरातील शैक्षणिक स्थितीचा अंदाज मांडणाऱ्या ‘असर’ (ASAR) या सर्वेक्षणामुळे भारतात भूकंप झाला आहे. बारावीत किंवा त्या स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या साधार 68 टक्के विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता येत नसल्याचे धक्कादायक निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जवळपास 21 टक्के विद्यार्थ्यांना सोपे मराठी आणि 39 टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीमधील सोपी वाक्ये वाचता आली नसल्याचेही या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. यासोबतच आणखीही काही गंभीर निरीक्षणे या अहवालात नोंदविण्यात आली आहेत. (Pratham Education Foundation conducted the 15th Annual Status of Education (ASAR) survey across the country.)

काय आहे असर?

या अहवालात काय काय सांगितले आहे ते जाणून घेण्याआधी असर हे नेमके काय आहे ते समजून घेऊ..‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’ने देशभरात 15 वे’अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन’ (असर) हे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काल (17 जानेवारी) जाहीर केले. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. गत काही अहवालांप्रमाणेच यंदाच्या अहवालानेही राज्याच्या शैक्षणिक अधोगतीचे दाखले दिले आहेत. यंदा 14 ते 18 वर्षे या वयोगटातील म्हणजेच आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अवगत केलेली भाषिक, गणिती कौशल्ये, त्याचे प्राथमिक पातळीवर उपयोजन अशा बाबींचे 1200 घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणातून काय दिसले?

या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार आठवी ते दहावीच्या 76.6 टक्के आणि अकरावी, बारावीतील केवळ 79 टक्के विद्यार्थ्यांनाच दुसरीच्या विद्यार्थ्यांना वाचता येणे अपेक्षित असलेला मराठी परिच्छेद वाचता आला. याशिवाय तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भाग देण्याचे गणित आठवी ते दहावीतील अवघ्या 35.7 टक्के आणि अकरावी, बारावीच्या 32.1 टक्के विद्यार्थ्यांनाच सोडविता आले. तर इंग्रजीतील सोपी वाक्ये, प्रश्न वाचू शकणाऱ्या आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण 50.6 टक्के आणि अकरावी, बारावीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण 60.8 टक्के होते.

मराठी परिच्छेद वाचू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण इंग्रजी आणि गणिती कौशल्यांच्या तुलनेत चांगले असले तरी वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजून उपयोजन करता येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच कमी आहे. वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आठवी ते दहावीच्या जवळपास 40 टक्के तर अकरावी, बारावीच्या 30 टक्के विद्यार्थ्यांना ‘ओआरएस’चा वापर कसा करावा याबाबत दिलेल्या सूचना वाचून त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. पट्टीवर ठेवलेल्या किल्लीची लांबी किती, वजन, हिशेब, वेळेचे गणित करता न येणाऱ्या आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांचे प्रमाणही 50 टक्क्यांहून अधिक आहे.

स्मार्ट फोनचेही धक्कादायक वास्तव :

या सर्वेक्षणानुसार आठवी ते दहावीतील 15.1 टक्के आणि अकरावी, बारावीतील 42.6 टक्के विद्यार्थ्यांकडे स्वत:चा स्मार्टफोन आहे. तर स्वत:चा फोन नसला तरी स्मार्टफोन वापरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अनुक्रमे 90.4 आणि 95.6 टक्के असल्याचे दिसून आले. यातीलही 90 टक्क्यांहून अधिक मुले समाज माध्यमांवर सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. मात्र बँकिंग आणि पासवर्ड असे बुद्धीचे काम अकरावी, बारावीतील केवळ 50 ते 58 टक्केच विद्यार्थ्यांना जमून आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube