पुणे : सध्या पुण्यामध्ये प्रेम संबंधातून गुन्हा घडल्याचा घटना सातत्याने समोर येत आहेत. आधी दर्शना पवार (Darshana Pawar Murder) आणि त्यानंतर एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर भरदिवसा हल्ला केल्याची घटना घडली होती. अशात पुण्यात प्रेम प्रकरणातून आणखी एक गुन्हा घडला आहे. एका विवाहित तरुणीनेच प्रियकराचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरातून तरुणाचे अपहरण करून त्याला गुजरातमधील वापी येथे नेण्यात आले होते. उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून वापीतून या तरुणाची सुटका केली आहे. (A married young woman kidnapped her lover and went Gujarat)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका तरुणाचे गुजरातमधील वापी येथे एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका 28 वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचा विवाह करण्याचे निश्चित केल्याने तो पुण्यात परतला होता. तरुणाने प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या विवाहित तरुणीने तरुणाच्या अपहरणाचा कट रचला. इतकेच नाही तर तरुणाचे अपहरण करुन थेट वापीला नेऊन डांबून ठेवले.
दरम्यान, तरुणाचे अपहरण झाल्याचा प्रकार लक्षात येताच तरुणाच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानुसार तपास केला असता, तरुणाचे कारमधून अपहरण करण्यात आल्याचे एनडीए रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आलं होतं. त्यानंतर तांत्रिक तपासात आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांच्या पथकाने वापी येथे एका हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका केली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.
याशिवाय आरोपी विवाहित तरुणीने प्रियकर तरुणाच्या अपहरणासाठी दोघांना सुपारी दिली होती. या प्रकरणी तरुणीसह सुपारी घेतलेल्या त्या दोन तरुणांना देखील अटक करण्यात आली आहे. प्रथमेश राजेंद्र यादव (वय 21, रा. बच्छाव वस्ती, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) आणि अक्षय मारुती कोळी (वय 26, रा. पुसेगाव, गोरे वस्ती, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.