पुणे : येथून खळबळजनक बातमी समोर येत आहे. किरकोळ वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं उघड झालं आहे. महादेव रघुनाथ मोरे (26) असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. तर पाच अल्पवयीन मुलांपैकी तिघे 15 वर्षांचे, एक 16 वर्षांचा आणि एक 17 वर्षांचा आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. (A young man was killed by five minors under the influence of alcohol)
याबाबत वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव आणि पाचही अल्पवयीन मुलांची जुनी ओळख आहे. यात महादेव हा एका खासगी कंपनीत कार्यालयीन सेवक म्हणून काम करत होता. तर पाच मुलांपैकी एक मुलगा शाळेत जातो आणि अन्य चौघे मिळेल ती कामे करुन उदरनिर्वाह करतात.
काही दिवसांपूर्वी महादेव आणि या पाचही मुलांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग या मुलांच्या मनात होता. शुक्रवारी रात्री महादेव आणि अल्पवयीन मुले रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळील डोंगरावर दारू प्यायला बसले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यात रागाच्या भरात अल्पवयीन मुलांनी महादेवला मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात दगड घातला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पण त्यापूर्वी मुले पसार झाले होते. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. तर पसार झालेल्या मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्येप्रकरणी अल्पवयीन पाच मुलांविरुद्ध वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.