पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचे (BJP) मंत्री (Minister) गुंडांना घेऊन प्रचार करत होते. गुंडांबरोबर त्यांचे काय डील झाले आहे मला माहिती नाही. पण भाजप जर गुंडांना घेऊन सर्वसामान्य जनतेला मत देण्यासाठी दमदाटी करत असेल तर मतदारांनी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवला पाहिजे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही अत्यंत चुकीचा निर्णय घेत एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देखील सर्वसामान्य जनतेला आवडलेला नाही. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मतदार भाजपला आणि एकनाथ शिंदे गटाला जागा दाखवून देईल. या दोन्ही पोटनिवडणुका राज्याची आणि देशाची पुढील कोणत्या दिशेने जाणार आहे, हे स्पष्ट करणारी असेल, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचार सभेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते.
Devendra Fadanvis यांचा पुन्हा गौप्यस्फोट… शिंदे ‘सुरत’मध्ये असताना उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता!
अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने केवळ उद्धव ठाकरे यांच्यावरच अन्याय केलेला नाही. तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम केले आहे. आता आपल्याला निवडणूक कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे, हे माहिती आहे. परंतु, निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा लोकशाहीला अत्यंत मारक आहे. सर्वसामान्य जनतेला हा निर्णय मान्य नसल्याचे प्रचारानिमित्त फिरत असताना मला जाणवले. त्यामुळे निश्चितपणे जनता भाजप आणि शिंदे गटाला जागा दाखवेल.
दुसरीकडे भाजपचे दोन मंत्री पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. तिथे त्यांना भेटायला गुंड येत आहेत. या गुंडांना घेऊन ते प्रचार करत आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की दहशत माजवून मतदारांमध्ये भीती पसरवून मतदान करण्यासाठी दबाव तंत्र, हे भाजपचे मंत्री करत आहेत. पण मला पूर्ण खात्री आहे की या दोन्हीही पोटनिवडणुकीत जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.