पुणे जिल्हा हा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि पर्यायाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी हा बालेकिल्ला संभाळला. त्यामुळे मागच्या 30 ते 35 वर्षांपासून अजित पवार आणि पुणे जिल्हा हे एक वेगळेच समीकरणच बनले आहे. एक प्रकारे त्यांचे वर्चस्व तयार झाले आहे. अजितदादांचा वेगळा गट आणि चाहता वर्ग या जिल्ह्यात निर्माण झाला आहे. अनेक वर्ष त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले. (Ajit Pawar close aid Ashok Pawar has been appointed as the new in-charge of the NCP in Pune)
मात्र आता याच पुण्यात अजितदादांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची आणि त्यांची मोर्चेबांधणी करण्याची तयारी शरद पवार यांनी सुरु केली आहे. विषेश म्हणजे ही जबाबदारी त्यांनी अजितदादांच्याच एकेकाळच्या खंद्या समर्थकाच्या खांद्यावर सोपविली आहे. अजित पवार यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अशोक पवार यांची पुण्याचे राष्ट्रवादीचे नवे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. आता ही नियुक्ती शरद पवार यांच्याच मान्यतेने झाली असणार हे उघड आहे. त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांनी पुण्यात अजितदादांना पर्याय शोधले असल्याचे बोलले जात आहे.
अजितदादांबरोबर तुमचे वाद आहेत का? जयंत पाटलांनी अखेर खरं सांगितलंच
अशोक पवारांना मिळाले प्रामाणिकपणा अन् निष्ठेचे फळ?
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 10 आमदारांपैकी इंदापूरचे दत्तात्रय भरणे, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे, पिंपरीचे अण्णा बनसोडे, मावळचे सुनिल शेळके, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, खेडचे दिलीप मोहिते हे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर चेतन तुपे आणि अशोक पवार अर्थात अशोक बापू हे शरद पवारांसोबत कायम राहिले आहेत. तर जुन्नरचे अतुल बेनके यांनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.
इतकंच नाही तर अशोक पवार यांची सत्ता असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. या कारखान्यासंदर्भात दहा दिवसांपूर्वीच पुण्यात बैठक घेतली होती. त्यामुळे ते पुन्हा अजित पवार यांच्यासोबत जातील असे वाटले होते. मात्र त्यानंतर देखील ते शरद पवार यांच्याच सोबत कायम राहिले. अशोक पवारांनी दाखविलेल्या याच प्रामाणिकपणा आणि निष्ठेमुळे आता शरद पवार यांनी आपला बालेकिल्ला अशोक पवार यांच्या हाती सोपविला असल्याचे दिसून येत आहे.
अजितदादांचे खंदे समर्थक म्हणून अशोक पवारांची ओळख :
अजितदादा आणि अशोक पवार या दोघांचे संबंध एकदम जवळचे आहेत. त्यांचे खंदे समर्थक म्हणून अशोक पवार ओळखले जातात. त्यामुळे ते अजितदादांसोबत राहतील अशी अटकळ पहिल्यापासून होती. रविवारी (2 जुलै) अजित पवार यांचा शपथविधी पार पडला तेव्हा अशोक पवार राजभवनात उपस्थित होते. पण प्रत्यक्षात त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. तीनच दिवसात त्यांनी भूमिका बदलत शपथविधीवेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून बोलावलं होतं. त्यामुळे आम्ही गेलो होतो. पण त्यावेळी खोटं बोलून आमच्याकडून सह्या घेतल्या, असा खुलासा त्यांनी केला होता.
रोहित पवार, तनपुरेंवर अजितदादांच्या बड्या नेत्यांविरोधात जबाबदारी, तर आव्हाडांची धनंजय मुंडेंशी टक्कर
राष्ट्रवादीच्या इतर आमदारांकडील जबाबदाऱ्या :
अनिल देशमुख यांच्याकडे विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. बीड आणि नांदेड जिल्हा वगळता मराठवाड्याची जबाबदारी राजेश टोपे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याची धुरा एकनाथ खडसे यांच्याकडे असणार आहे.बीड जिल्ह्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड हे पेलणार आहेत. त्यामुळे बीडमध्ये दोन ओबीसी नेत्यांमध्ये जोरदार टक्कर दिसून येणार आहे. याचबरोबर आव्हाड यांच्यावर ठाण्याची जबाबदारी आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भंडारा, गोंदिया आणि रायगडसाठी मोर्चेबांधणीची जबाबदारी रोहित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नाशिक आणि नगर जिल्ह्याची जाबाबदारी असणार आहे. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी देण्यात आली आहे. पालघर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्याची जबाबदारी सुनील भुसारा यांच्याकडे देण्यात आली आहे. मुंबई, सांगली आणि कोल्हापूरसाठी सध्या तरी कुठलेही प्रभारी नेमण्यात आलेले नाहीत.