रोहित पवार, तनपुरेंवर अजितदादांच्या बड्या नेत्यांविरोधात जबाबदारी, तर आव्हाडांची धनंजय मुंडेंशी टक्कर

  • Written By: Published:
रोहित पवार, तनपुरेंवर अजितदादांच्या बड्या नेत्यांविरोधात जबाबदारी, तर आव्हाडांची धनंजय मुंडेंशी टक्कर

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडल्यानंतर दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. शरद पवार, अजित पवार गटाकडून पदाधिकारी नेमण्यात येत आहेत. तसेच आपल्या नेत्यांच्या सभा घेऊन एकमेंकावर जोरदार टोलेबाजी करत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आता शरद पवार (Sharad Pawar) गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) जिल्हा प्रभारीपदाची यादी जाहीर केली आहेत. आपल्याकडे असलेल्या मोजक्याच शिलेदारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. प्रत्येकाला जास्त जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी वळसे पाटलाचं वयचं काढलं! म्हणाले, तेवढं वय..,

काही अपवाद वगळता एका नेत्याला एक जिल्हा असा पायंडा असलेल्या राष्ट्रवादीत आता एका नेत्यावर तीन जिल्ह्यांपेक्षा अधिक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्याकडे विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. बीड व नांदेड जिल्हा वगळता मराठवाड्याची जबाबदारी राजेश टोपे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याची धुरा एकनाथ खडसे यांच्याकडे असणार आहे. पुण्याची जबाबदारी आमदार अशोक पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. अशोक पवार हे अजित पवारांचा शिलेदार मानले जात होते. त्यांच्याकडे आता अजित पवारांची मोर्चेबांधणीची जबाबदारी देण्यात आली आहे.

आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणार की नाही? सलग तीन ट्विट करत अजितदादांचे शरद पवारांवर थेट वार

धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड हे पेलणार आहेत. त्यामुळे बीडमध्ये दोन ओबीसी नेत्यांमध्ये जोरदार टक्कर दिसून येणार आहे. याचबरोबर आव्हाड यांच्यावर ठाण्याची जबाबदारी आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भंडारा, गोंदिया आणि रायगडसाठी मोर्चेबांधणीची जवाबदारी रोहित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नाशिक आणि नगर जिल्ह्याची जाबाबदारी असणार आहे. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी देण्यात आली आहे. पालघर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्याची जबाबदारी सुनील भुसारा यांच्याकडे देण्यात आली आहे.

मुंबई, सांगली आणि कोल्हापूरसाठी सध्या तरी कुठलेही प्रभारी नेमण्यात आलेले नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मोर्चेबांधणी , पक्षसंघटन समन्वय ही मोठी जबाबदारी मोजक्या शिलेदारांच्या खांद्यावर टाकली आहे. यातील प्राजक्त तनपुरे, सुनील भुसारा, रोहित पवार यांच्यासाठी एकाच वेळी अनेक जिल्ह्यांची जबाबदारी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube