आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणार की नाही? सलग तीन ट्विट करत अजितदादांचे शरद पवारांवर थेट वार

आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणार की नाही? सलग तीन ट्विट करत अजितदादांचे शरद पवारांवर थेट वार

मुंबई : “शरद पवार यांना आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही” असं विधान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले आणि राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. शरद पवार यांच्या गटाकडून वळसे पाटील यांच्यावर ‘कृतघ्न’ म्हणत जोरदार टीका करण्यात आली, त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या टीका आणि निदर्शनानंतर वळसे पाटील यांनीही दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यानंतरही अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत वळसे पाटील यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले आणि सलग तीन ट्विट करत शरद पवार यांच्यावर तीन वेळा टीका केली. (After Dilip Walse Patal, Ajit Pawar also criticized ncp chief Sharad Pawar)

नेमकं काय घडलं?

आज दुपारनंतर या वादात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एन्ट्री घेतली. अजित पवार यांनी ट्विट करत आक्रमक भूमिका घेतली आणि आपण वळसे पाटलांच्या पाठिशी उभे असल्याचा संदेश दिला. “नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे”, असं म्हणतं शरद पवार यांच्यावर टीका केली.

https://twitter.com/NCPSpeaks1/status/1693561018985988157

त्यानंतर आता अवघ्या एका तासात दुसरे ट्विट करत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा टीका केली. “ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या बळावर पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणली. अरविंद केजरीवालांनी दोन राज्यात सत्ता स्थापन केली. नीतिश कुमारांनी बिहारमध्ये वर्चस्व स्थापन केलं आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू, वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी स्वबळावर सत्ता आणली. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांनी एकहाती सत्ता स्थापन केली.

https://twitter.com/NCPSpeaks1/status/1693574352074342638

मात्र, या सर्वांमध्ये आदरणीय शरद पवार साहेब हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ वर्षांच्या इतिहासात पक्षाला महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करता आली नाही, याबाबतची खंत मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात व्यक्त केली होती. आपण याबाबत आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणार की नाही, अशी विचारणा त्यांनी व्यासपीठावरून केली होती”, असे म्हंटले आहे.

https://twitter.com/NCPSpeaks1/status/1693612124919263430

त्यापाठोपाठ, आदरणीय शरद पवार साहेब यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले. वरील चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतरच्या गेल्या २५ वर्षात वारंवार झाली आहे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, ही सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आंतरिक इच्छा असून त्याचेच पडसाद या चर्चेतून उमटले. माननीय दिलीप वळसे पाटील यांचे विधान याच २५ वर्षांच्या कालावधीच्या अनुषंगाने घेता येईल, असे म्हणतं पुन्हा एकदा पवारांना लक्ष्य केले आहे.

दिलीप वळसे पाटील काय म्हणाले होते?

काल (20 ऑगस्ट) वळसे पाटील यांनी मंचर येथील एका मेळाव्यात बोलताना, “शरद पवार यांना आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही, असा दावा केला होता. आपल्याकडे शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात, नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते. देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या”, असं ते म्हणाले होते.

शरद पवार गट आक्रमक अन् वळसे पाटलांची दिलगिरी

वळसे पाटील यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार गट आक्रमक झाला आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी वळसे पाटील यांना कृतघ्न म्हंटले होते. कार्यकर्त्यांनी तर मंचर आणि मुंबई येथे वळसे पाटलांच्या विरोधात आंदोलन केले. या टिकेनंतर आज ट्विटरच्या माध्यमातून वळसे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हंटले.

अजित पवारांच्या गटाचे दुसरे ट्विटक अकाऊंट :

अजित पवार गटाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच ट्विटर नवीन अधिकृत अकाऊंट उघडण्यात आले आहे. त्यावरुन या टीका करण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ या दोन्ही गटातील वाद लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. शरद पवार यांच्यावर व्यैयक्तिक हल्ले करण्यासहित अजित पवार गट मागे-पुढे पाहणार नसल्याचे पक्षाच्या आजच्या ट्विटमधून दिसून येते. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डेलवरुन ही अजित पवार यांचीच भूमिका आहे हे देखील तितकेच स्पष्ट आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube