Download App

Pune : चेतन तुपे तळ्यात-मळ्यात; त्यांच्यासमोरच अजितदादांनी हडपसरसाठी शोधला नवा पर्याय

पुणे : जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 10 पैकी 6 आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाजूने आपला कौल दिला आहे. तर अशोक पवार यांनी शरद पवार यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ हडपसरचे चेतन तुपे आणि जुन्नरचे अतुल बेनके हे अद्याप तळ्यात मळ्यात आहेत. बेनकेंची भूमिका स्पष्ट नसली तरी काही दिवसांपासूनच्या त्यांच्या हालचाली पाहता ते अजितदादांच्या गटात जवळपास पोहचले आहेत. फक्त निर्णय जाहीर करणे बाकी आहे. यानंतर आता अजितदादांनी हडपसरसाठी चेतन तुपे यांची वाट न बघता आपल्या गटातून नवीन चेहरा शोधला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. (Ajit Pawar is likely to nominate Yogesh Sasane from Hadapsar instead of Chetan Tupe)

कोण आहे नवा चेहरा?

माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी स्वखर्चातून ससाणेनगरमध्ये उभारलेला 106 फूट उंचीचा तिरंगा ध्वज स्तंभाचा लोकार्पण सोहळा आज आयोजित केला होता, यावेळी अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हडपसरच्या जनतेच्या हितासाठी, नागरी प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या नगरसेवक योगेशबापू ससाणे यांनी 106 फूट उंचीचा तिरंगा ध्वज स्तंभ स्वखर्चाने उभारून नव्या पिढीत राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम केले असल्याचे मत यावेळी अजितदादांनी व्यक्त केले. यावेळी अजित पवार यांच्यासमोर ससाणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

ससाणे यांनी या कार्यक्रमाला चेतन तुपे यांच्यासह श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राऊत, एग्झ्युक्युटीव्ह चेअरमन विकास रासकर, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्यासह पुणे महापालिकेतील सर्व माजी नगरसेवक हडपसर प्रभागात बोलवले होते. या सर्वांची कोनशिलेवर नावे टाकून त्यांचा सन्मानही केला. मात्र या निमित्ताने आगामी मोठ्या निवडणुकीसाठी बेरजेचे राजकारण केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी नागरिकांमध्ये ऐकायला मिळाली. तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्याचे फोटो लावून दोन्ही गटांना समांतर ठेवण्याची कला साधल्याची खमंग चर्चा कार्यक्रम स्थळी दिसून आली.

ससाणेंनी अजितदादांपुढे वाचला प्रश्नांचा पाढा :

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ससाणे यांनी वाहतूक कोंडी, सोलापुर रोडला पर्यायी रस्ते, ससाणे नगर रेल्वे भुयारी मार्ग, पाणी टंचाई, हडपसर भाजी मंडई विस्तारीकरण, बेबी कॅनाल वरुन रोड अथवा मेट्रो प्रकल्प, हडपसर विधान सभा मतदारसंघांतील सुमारे 6 ठिकाणचे विविध अंडरपास, रामटेकडी कचरा प्रकल्प या गंभीर प्रश्नाकडे अजितदादांचे लक्ष वेधत विविध उपाययोजना राबवण्याची मागणी यावेळी केली.

Tags

follow us