पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे, कष्टकऱ्यांचे शहर आहे. या भागाचे काम करण्याची संधी ज्यावेळी मला येथील जनतेने दिली. तेव्हा मी सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन काम केले. प्रत्येकाला चांगली पदे दिली. एका महिला भगिनीने तर मला स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या नाहीतर मी जीवच देईन, अशी धमकी दिल्याचा किस्सा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भरसभेत सांगितल्याने एकच हास्यकल्लोळ झाला. तसेच उद्योगनगरी असलेल्या या शहरात काम करायला लोकं मात्र पुणे आणि इतर ठिकाणाहून यायची. मग मी विचार केला आणि पुण्याच्या तोडीस तोड शहर बनवले. हे माझे विरोधक देखील सांगू शकतील, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
चिंचवड पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारसभेत अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, मी या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाला संधी दिली. त्यामध्ये गावातील आणि गावाबाहेरच्या अशा प्रत्येकाला संधी दिली. त्याचे एकच कारण की या उद्योगनगरीचा सर्वांगीण विकास करायचे हेच ध्येय होते. पिंपरी-चिंचवडचे नाव केवळ आशिया खंडातच नाही तर जगभर घेतले जात आहे.