उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारी २०२६ रोजी अपघात झाला. (Ajit Pawar) या भीषण अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानतंर आता या अपघाताभोवतीचे गूढ अधिक गडद झाले आहे. अजित पवारांच्या निधनाला एक महिना उलटल्यानंतर आता त्यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टने सध्या महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
जय पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ज्या VSR कंपनीच्या विमानात अजित पवार यांचा अंत झाला, त्या कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप केले आहेत. जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंह हा मुख्य पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विमान आकाशात असताना रोहित सिंह चक्क झोपलेला आहे. या गंभीर निष्काळजीपणावर जय पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
अजित पवार अपघात प्रकरणात CID ची एंट्री; DGCA ची VSR वर कारवाई; CID तपासात नवे पुरावे समोर
जय पवार यांनी या व्हिडीओ पोस्ट करत तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असे जय पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान जय पवार यांच्या या पोस्टनंतर आता व्हिएसआर कंपनीवर टीकेची झोळ उठताना दिसत आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच याप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे आता जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओनंतर तरी दोषींवर गुन्हा दाखल होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
