Download App

Ambadas Danve : विरोधकांच्या दबावामुळेच ललित पाटील प्रकरणाचा तपास; दानवेंनी स्पष्टच सांगितलं

Ambadas Danve : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पुण्यातील ससून रुग्णालयास भेट दिली.  येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. या प्रकरणात राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या समित्या या तोंडदेखल्या आणि बोलघेवड्या आहेत. या समित्या काही करु शकणार नाहीत. उलट या समित्या काही लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करतील असा आरोप करत आता नागपुरला अधिवेशन असून या अधिवेशनात निश्चित आवाज उठवणार आहोत, असा इशारा दानवे यांनी दिला. 

‘सरकारने विश्वास दिला होता, जरांगेंचा दोष नाही’; शरद पवारांनी उपोषणावर मौन सोडलं

या प्रकरणात ससून रुग्णालयाच्या  डीनवर कारवाई करण्याची मागणी करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर दानवे म्हणाले, जे कुणी संबंधित आहेत. ज्याने कुणी कैद्याला अशा प्रकारे ठेवायला आणि पळून जाण्यास मदत केली त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मग तो डीन असो किंवा आणखी कुणीही असो. ललित पाटील प्रकरणात विरोधी पक्षांनी आवाज उठवला म्हणूनच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. म्हणूनच अटकाही होत आहेत. या प्रकरणात शिवसेनेने याआधीच स्पष्ट भूमिका मांडली आहे.

गृहमंत्री फडणवीस जबाबदार नाहीत का ?

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ललित पाटील प्रकरणात बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, असे वक्तव्य केले होते. यावरही दानवे यांनी भाष्य केले. एक कैदी पळून जात असेल पळून नाही तर तो चालत चालत गेला. पोलिसांच्या बंदोबस्तात गेला. मग ही राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का? पोलिसांच्या तावडीतून तो गेला मग याला गृहमंत्री जबाबदार नाही? असा माझा त्यांना सवाल आहे, असे दानवे म्हणाले.

मुंबईचं महत्व कमी करणारे महाराष्ट्रद्रोही 

मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला हलविण्यात येत असल्याच्या चर्चा आहेत. यावर दानवे म्हणाले, हा प्रश्न मराठी माणसाचा नाही तर मुंबईचा आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. गुजरातवाल्यांच्या डोक्यात खुपते. म्हणून इथले उद्योग गुजरातला नेले जात आहेत. आता हिऱ्यांचा व्यापार सुद्धा नेण्याचा प्रयत्न सुरु आहे.पण आर्थिक राजधानी ही मुंबईच राहणार आहे. मुंबईच महत्व जे कमी करतात ते महाराष्ट्रद्रोही आहेत, असा घणाघाती आरोप दानवे यांनी केला.

ललित पाटील प्रकरणात माजी महापौर विनायक पांडेची होणार चौकशी, गुन्हे शाखेने पाठवली नोटीस

केंद्राने मर्यादा वाढवल्यास आरक्षण मिळेल

मराठा आरक्षणाचा मुद्दा जनतेच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. जेव्हा हे आरक्षण कोर्टात गेलं तेव्हा हेच फडणवीस म्हणाले होते की आमचं सरकर येऊ द्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ होईल. आता केंद्रात आणि राज्यात यांचच सरकार आहे. केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवली तर समाजाला आरक्षण मिळेल, असे दानवे म्हणाले.

follow us