Amit Shah lauds… : लोकमान्य टिळकांच्या विचारांचे आजही मोठे महत्त्व असून, भगवद्गीता लोकमान्य टिळकांच्या दृष्टीकोनातून वाचली तर आयुष्यात चुका होणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. टिळक स्मारक समितीच्या वतीने आयोजित लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याला उजाळा देताना अमित शाह म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांचे योगदान अतुलनीय आहे. शिक्षक, पत्रकार, समाजप्रबोधक आणि राष्ट्रनेते अशा विविध भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्या. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” ही त्यांची घोषणा केवळ एक घोषणा नव्हती, तर ती देशातील कोट्यवधी जनतेसाठी प्रेरणामंत्र ठरली. या विचारातून स्वातंत्र्याची ज्योत देशभर प्रज्वलित झाली आणि स्वातंत्र्यलढ्याला व्यापक जनाधार मिळाला, असे शाह यांनी सांगितले.
लोकमान्य टिळकांनी निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती केली. इंग्रज सत्तेला जर कोणत्या वर्तमानपत्रांची भीती वाटत असेल तर ती ‘केसरी’ आणि ‘द मराठा’ ही वृत्तपत्रे होती, असे सांगत शाह यांनी टिळकांच्या पत्रकारितेचा गौरव केला. जनशक्तीशिवाय राष्ट्रशक्ती सशक्त होऊ शकत नाही, हा टिळकांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिशाभूल झालेल्या मुलांना शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही; नीट आंदोलनावरील पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
यावेळी अमित शाह यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही जयंतीनिमित्त अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. अवघे दीड दिवस शालेय शिक्षण मिळूनही त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर साहित्यविश्वात अढळ स्थान निर्माण केले. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले, असे शाह म्हणाले.
स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राजकीय स्वातंत्र्य नसून आत्मनिर्भरता, शिस्त आणि कर्तव्यभावना हेही त्याचे महत्त्वाचे पैलू असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे सांगत त्यांनी उपस्थितांना टिळकांचे साहित्य आणि विचार वाचण्याचे आवाहन केले. टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींनाही त्यांना “लोकमान्य” म्हणावे लागले, यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि प्रभाव लक्षात येतो, असेही ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान करण्याची संधी दिल्याबद्दल अमित शाह यांनी टिळक स्मारक समितीचे आभार मानले. अजित डोबाल यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.
सिरसाळ्यात धनंजय मुंडेंची भावनिक खंत; आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही, एकाला घरी बसावं लागलं
गुजरातमधील साखळी बॉम्बस्फोटांच्या तपासाचा संदर्भ देताना अमित शाह म्हणाले की, त्या काळात नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी अजित डोबाल यांच्या कार्यक्षमतेची माहिती मोदींनी दिली होती. डोबाल यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे देशातील 13 बॉम्बस्फोटांच्या प्रकरणांचा उलगडा करण्यात यश आले. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान देश कधीही विसरणार नाही, असे शाह यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली अजित डोबाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला नवे बळ मिळाले. पाकिस्तानमध्ये तब्बल सहा वर्षे राहून त्यांनी देशासाठी अत्यंत धोकादायक आणि महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. देशाच्या इतिहासात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर सर्वाधिक काळ कार्यरत राहणारे अजित डोबाल हे एकमेव व्यक्तिमत्त्व असल्याचेही शाह यांनी नमूद केले.
देश आणि समाजासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तींचा योग्य सन्मान झाला पाहिजे, असे सांगत अमित शाह यांनी अजित डोबाल यांचा गौरव केला. लोकमान्य टिळकांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा असून देशसेवा, राष्ट्रनिष्ठा आणि समर्पण यांचे प्रतीक असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.
