सिरसाळ्यात धनंजय मुंडेंची भावनिक खंत; आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही, एकाला घरी बसावं लागलं
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात वसंतराव नाईक यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
Dhananjay Munde’s emotional lament : बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे लोकनेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासातील भावना व्यक्त करत खंत बोलून दाखवली. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी राज्याच्या विकासात आणि ग्रामीण भागाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात वसंतराव नाईक यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. 1972 च्या भीषण दुष्काळाच्या काळात राज्यातील लाखो कुटुंबांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आधार देण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले. संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस आणि दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. त्यामुळेच आज देखील ग्रामीण महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना कायम असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
नाईक कुटुंबाचा उल्लेख करताना त्यांनी जगदंबेची कृपा या कुटुंबावर कायम राहिल्याचे म्हटले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक आणि इंद्रनील नाईक यांनी देखील राजकारणात आपलू वेगळी ओळख निर्माण केली असून जनतेची सेवा करण्याची परंपरा पुढे नेल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आपल्या राजकीय आयुष्याबाबत बोलताना धनंजय मुंडे भावुक आले झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या आणि पंकजा मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत मनातील खंत व्यक्त केली. आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही. आम्हा दोघांपैकी एकाला मात्र घरी बसावं लागलं, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
दिशाभूल झालेल्या मुलांना शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही; नीट आंदोलनावरील पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
पुढे बोलताना त्यांनी पंकजा मुंडे आणि स्वतःचे समाजाशी असलेले नाते अधोरेखित केले. पंकजा मुंडे असोत किंवा मी, आमचं आणि समाजाचं नातं हे राजकारणापलीकडचं आहे. जनतेने आम्हाला दिलेलं प्रेम, विश्वास आणि साथ हीच आमची खरी ताकद आहे, असे ते म्हणाले. उपस्थित कार्यकर्त्यांकशी संवाद साधताना त्यांनी एक भावनिक शेर देखील उद्धृत केला. मैदान में हारा हुआ इंसान फिर जीत सकता हैं, लेकिन अपनों का साथ निभाने वाला कभी हारता नहीं. असे म्हणत त्यांनी संघर्ष, निष्ठा आणि जनतेच्या विश्वासाचे महत्व अधोरेखित केले. राजकीय यश-अपयश हा प्रवासाचा भाग असला तरी समाजाशी असलेले नाते आणि कार्यकर्त्यांची साथ हीच खरी संपत्ती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात काही काळ भावनिक वातावरण निर्माण झाले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली असून, आगामी काळातील त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.