Amol Balwadkar Exclusive : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 9 बाणेरमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अमोल बालवडकर यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा सुरु असताना अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा तिकीट कापण्यात आल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करत प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर लेट्सअप मराठीशी बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत महापालिका निवडणुकीसाठी तिकीट देऊ असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता असा दावा अमोल बालवडकर यांनी केला आहे.
लेट्सअप मराठीच्या (Letsupp Marathi) लेट्सअप विशेष या कार्यक्रमात बोलताना अमोल बालवडकर (Amol Balwadkar) म्हणाले की, मी विधानसभेसाठी इच्छुक होतो मात्र तुला महापालिकेत तिकिट देऊ, चांगली जबाबदारी देऊ असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला होता. राजकारणात देखील काही तत्व असतात. जेव्हा मी विधानसभेसाठी इच्छुक होते तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर मी थांबलो होतो. त्यानंतर चंद्रकांतदादा घरी आले होते आणि आई वडिलांसमोर शब्द दिला होता की, आम्ही अमोलच्या पाठीशी राहू आणि महापालिकेत देखील चांगली संधी देऊ मात्र असं काही झालं नाही असं लेट्सअप मराठीशी बोलताना अमोल बालवडकर म्हणाले.
पुढे बोलताना अमोल बालवडकर म्हणाले, एबी फॉर्मसाठी मी चंद्रकांत पाटील यांना फोन करत माहिती घेतली तेव्हा मला सांगण्यात आलं की, दुपारी एक वाजता एबी फॉर्मबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र मला दुपारी एक वाजता देखील त्यांच्याकडून काहीच अपडेट मिळाली नाही. दुपारी 1.30 च्या नंतर मला एबी फॉर्म मिळणार नाही असं चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं. तेव्हा मला कळलं की यांनी गाफील ठेवून आपला करेक्ट कार्यक्रम केला आहे असं देखील या कार्यक्रमात बोलताना अमोल बालवडकर म्हणाले.
अजितदादांचा कॉल अन् राजकीय जीवनाला कलाटणी
पुणे महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 1.30 तास उरलेला असताना उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोन मला आला आणि त्यांनी मला प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऑफर दिली. अजितदादांचा तो फोन माझ्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारा ठरला असेही लेट्सअप मराठीशी बोलताना पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 9 चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवकर म्हणाले.
