चौदा वर्षांपासून ‘शिवसृष्टी’चा वनवास ! प्रकल्पासाठी जागा देण्यास भाजप अपयशी; अमोल बालवडकरांकडून भावनिक मुद्दा

Amol Balwadkar -अंदाजपत्रकात 'शिवसृष्टी'चा उल्लेख करून नागरिकांच्या भावना जागृत केल्या जातात; परंतु प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी नाही.

Amol Balwadkar

Amol Balwadkar

Amol Balwadkar : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल बालवडकर (
Amol Balwadkar) यांनी अत्यंत महत्त्वाचा व भावनिक मुद्दा उपस्थित केला. गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून उभ्या राहणाऱ्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पासाठी सातत्याने मागणी होत आहे. मात्र, तब्बल 14 वर्षे उलटूनही या प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरत आहे. दुसरीकडे ‘भारत मंडपम’सारख्या काल आलेल्या नव्या प्रकल्पाला अत्यंत वेगाने तब्बल 50 एकर जागा मंजूर केली जाते, ही बाब निश्चितच विरोधाभासी आणि चिंताजनक असल्याचे अमोल बालवडकर यांनी म्हटलंय.

दरवर्षीच्या अंदाजपत्रकात ‘शिवसृष्टी’चा उल्लेख करून नागरिकांच्या भावना जागृत केल्या जातात; परंतु प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी होत नाही. हे केवळ दुर्लक्ष नसून, छत्रपती शिवरायांचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असल्याची भावना व्यक्त केली. जर हा प्रकल्प राबवायचा नसेल, तर तो वारंवार अंदाजपत्रकात दाखवून जनतेची दिशाभूल करू नये, अशी स्पष्ट भूमिका बालवडकर यांनी मांडली. एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि जागरूक नागरिक म्हणून या अन्यायाचा मी निषेध नोंदवितो.

बालवडकर म्हणाले, ‘भारत मंडपम’ प्रकल्पाला आमचा विरोध नाही, तर त्याच्या नियोजनाला विरोध आहे. विमानतळ परिसरासारख्या आधीच वर्दळीच्या भागात इतक्या मोठ्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. हजारो-लाखो लोकांची वर्दळ वाढल्यास नागरिकांना तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. याशिवाय, या ठिकाणी पूर्वी प्रस्तावित असलेले रुग्णालय, उद्यान, भाजी मंडई व पार्किंग यांसारखी अत्यावश्यक आरक्षणे बाजूला सारली जात असल्याचे स्थानिक नागरिकांच्या सोयी-सुविधांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे असे सूचित केले की, ‘भारत मंडपम’सारखा मोठा प्रकल्प हा शहराबाहेरील रिंगरोड परिसरात अधिक प्रशस्त जागेत उभारल्यास तो सर्वांच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर आणि शाश्वत ठरेल.तसेच पुणे शहराच्या अस्मितेचा आणि शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करून ‘शिवसृष्टी’ प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, ही मागणी यावेळी ठामपणे केली.

वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधले
यासोबतच शहरात वाढत्या बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधले. सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत सुरू असलेल्या बांधकामांमुळे धूळ, आवाज आणि हवेतील प्रदूषण वाढत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट करून केवळ नियम जाहीर करून न थांबता त्यांच्या कठोर अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली.

तसेच बाणेर-बालेवाडी परिसरातील अपूर्ण प्रकल्प, खराब रस्ते, सततचे उकरकाम, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे नमूद केले. शहराचा वेगाने विस्तार होत असताना मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त केली.

याशिवाय हवेच्या गुणवत्तेसाठी ठोस उपाययोजना, बांधकामांवर नियंत्रण, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. “मेट्रोमधून खाली पाहिल्यावर जर कचरा, खड्डे आणि कोंडीच दिसत असेल, तर विकासाचा अर्थ काय?” असा सवाल करत पादचारी मार्ग मोकळे करणे, सुरक्षित रस्ते आणि सुरळीत वाहतूक ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे बालवडकर यांनी ठामपणे सांगितले.

Exit mobile version