Andekar VS Komkar Gang War History : वर्षभरापूर्वी पुण्यात वनराज आंदेकरचा अंत्यविधी… शस्त्रपूजनाची शपथ… आणि गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला उडालेला रक्तरंजित गँगवार! आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी…पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास पाहू या…
गणेशोत्सवाच्या उत्साहात पुण्याच्या नाना पेठ (Andekar VS Komkar Gang War) परिसरात मात्र रक्तरंजित टोळीयुद्धाचा स्फोट झाला. पोलीस कमिशनरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रूट मार्च संपल्यानंतर अवघ्या दोन तासांतच गोळ्या झाडल्या गेल्या… आणि गदारोळ माजला. दि. 5 सप्टेंबर 2025 … वार शुक्रवार… रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास… 20 वर्षांचा आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर आपल्या मित्रासह घराजवळ उभा (Pune) होता. अचानक दोन शस्त्रधारी समोर आले… आणि क्षणार्धात तीन गोळ्या झाडल्या. आयुष जागीच कोसळला. क्लासवरून घरी परतताच त्याच्यावर (Crime) घात झाला. आरोपी मात्र फरार झाले.
सूडाची शपथ! नातवाचा घेतला बळी
माजी नगरसेवक आणि आंदेकर टोळीचा आधारस्तंभ वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याचा एक वर्षापूर्वी खून करण्यात आला होता. त्याच प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर… आणि आता बदल्याच्या हव्यासापोटी कोमकर यांच्या मुलाचा बळी घेतलाय, टोळीयुद्धाच्या वैरातून घडलेल्या या खुनामुळे शहरात दहशतीचं सावट आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या कुटुंबातील वैर आणि घरगुती वादातून अखेर रक्तरंजित शेवट झाला. परंतु याचं कारण ठरतंय…ते एक दुकान. वनराज यांचे काका उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला दुकान व्यवसायासाठी दिलं होतं. मात्र, मनपाच्या अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडलं गेलं. या घटनेचा राग मनात ठेवूनच, कोमकर कुटुंबाशी झालेल्या मतभेदातून वनराज आंदेकरची निर्घृण हत्या करण्यात आली.
आंदेकर कुटुंबातील एका मुलीचं लग्न कोमकर कुटुंबात झालं होतं. घर, दुकान आणि नातेसंबंध या सगळ्या गोष्टी असूनही घरगुती वाद वाढत गेले. त्याचा परिणाम थेट हत्येपर्यंत पोहोचला. यात वन बहिणीचा दीर असलेला गणेश कोमकर हा मुख्य आरोपी आहे. या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गटाने रेकी करून गणेश कोमकरच्या मुलाची हत्या (Aayush Komkar) केल्याचं बोललं जातंय.
याच काळात आंदेकर गट आणि सोमनाथ गायकवाड टोळी यांच्यातील जुना वैरही पेटलेलं होतं. 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते आणि निखील आखाडेवर केलेल्या हल्ल्यात निखीलचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गायकवाड टोळी सूड घेण्यासाठी सतत संधीची वाट पाहत होती. याच परिस्थितीचा फायदा घेत कोमकर गटाने सोमनाथ गायकवाडला वनराज आंदेकरच्या हत्येची सुपारी दिल्याचं पुढे उघड झालं.
आंदेकर घराणं पूर्वीपासून गँगवारच्या इतिहासाशी जोडलेलं आहे. बंडू आंदेकर या गटाचा प्रमुख मानला जातो. 90 च्या दशकात आंदेकर विरुद्ध माळवदकर गँगवार गाजलं होतं. त्यावेळी प्रमोद माळवदकरचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला आणि आंदेकर गटाची ताकद पुन्हा वाढू लागली.
राजकीय क्षेत्रातही या कुटुंबाचा मजबूत दबदबा होता. वनराज आंदेकर हे 2017 मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले. 2017 ते 2022 या कालावधीत त्यांनी पद भूषवलं. त्याआधी त्यांच्या आई राजश्री आंदेकर यांनी 2007 आणि 2012 या दोन सलग टर्ममध्ये नगरसेविका म्हणून काम पाहिलं होतं. तसेच वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक राहिले होते.
गणेशोत्सवाच्या उत्साहात पुण्यात पेटलेलं आंदेकर-कोमकर गँगवार हे केवळ दोन टोळ्यांचं वैर नाही, तर कुटुंबीय नातेसंबंध, घरगुती वाद, राजकीय दबदबा आणि गुन्हेगारी जगाचा संगम आहे. एका नगरसेवकाचा अंत, नातवाचा बळी आणि सूडाची शपथ — या रक्तरंजित संघर्षामुळे पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे. आता प्रश्न असा आहे की, पोलrस कारवाई आणि राजकीय हस्तक्षेपाच्या छायेत या गँगवारचा शेवट होणार, की पुन्हा एखाद्या हत्येची नोंद शहराच्या रस्त्यांवर उमटणार?