Pune Crime : खुनाच्या बदल्यात नातवाचा खून! अंत्यविधीला शस्त्रपूजन अन् बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर संघर्ष पेटला…

Pune Crime Andekar Komkar Gang War : पुण्यातील नाना पेठ परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबाराने शहर हादरले. गणेशोत्सवाचे औचित्य साधून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त उभारला असतानाच टोळीयुद्धाचा भडका उडला. आंदेकर टोळी आणि कोमकर गट यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला असून, या चकमकीत 20 वर्षीय आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकरचा जीव गेला.
नाना पेठ रक्तरंजित…
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आयुष (Vanraj Andekar)आपल्या मित्रासोबत श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ उभा असताना दोन हल्लेखोरांनी (Pune Crime) त्याच्यावर थेट गोळ्या झाडल्या. तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला (Ayush Ganesh Komkar) आणि जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात आणखी एक जण जखमी झाला असून, आरोपी पळून गेले. शहराच्या मध्यवर्ती भागात, विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेमुळे नागरिकांत (Andekar Komkar Gang War) प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की काय घडलं होतं?
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक व आंदेकर टोळीचे मुख्य आधारस्तंभ वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात गणेश कोमकरसह काही जण आरोपी होते. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ घेतली होती. या प्रकरणातील एक कट भारती विद्यापीठ पोलिसांनी उधळला होता. चार जणांना अटक केली होती. मात्र, नाना पेठेतील घटना पोलिसांच्या हाताबाहेर गेली.
टोळीयुद्धाने पोलिसांवर प्रश्नचिन्ह
मृत आयुष हा गणेश कोमकरचा मुलगा आहे. गणेश कोमकरची पत्नी बंडू आंदेकरची मुलगी आहे. म्हणजेच नातेसंबंधातून आंदेकर-कोमकर संघर्ष अधिक गुंतागुंतीचा झाला होता. वनराज आंदेकरच्या खुनानंतर या वैराला अजून धार आली होती. यावेळी हल्ल्याचा बळी बंडू आंदेकरचा नातू ठरला. शहरात बंदोबस्त असूनही झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या खुनामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागात भीतीचे सावट पसरले आहे.
पोलिसांचा तपास
हल्ल्यात दोन आरोपींनी थेट गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली आहे. घटनेमागील नेमका हेतू शोधण्याचे काम सुरू असून, स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेची सहा पथके आरोपींच्या मागावर आहेत. मृत आयुष कोमकरच्या नातेवाइकांची तक्रारही नोंदवली जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.