Baramati By-Election : बारामती पोटनिवडणुकीची घाई…., मतदार यादी तयारीचा आदेश

Baramati By-Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता लवकरच बारामतीमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

Baramati By Election

Baramati By Election

Baramati By-Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता लवकरच बारामतीमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत बारामती विधानसभा मतदारसंघासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 नुसार विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात बारामतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकावर आधारित असेल. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदारयादी अपडेट, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून त्या 6 मार्च 2026 पर्यंत निकाली काढण्यात येणार असून, अंतिम मतदारयादी (Baramati By-Election) मंगळवार, 10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या बैठकीत राजकीय पक्षांना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व सूचना-आदानप्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) संधी देण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकतंच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यानंतर बारामतीमधून सुनेत्रा पवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितलं जात आहे.

पैसा येणार, व्यवसायात होणार फायदा; जाणून घ्या ‘या’ राशींसाठी आजचा दिवस कसा असणार?

28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे एका विमान अपघातात निधन झालं होतं.

Exit mobile version