पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) भाजपमध्ये आक्रमक आणि अभ्यासू वक्ता म्हणून ओळखले जाते. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या भाषणाचे चाहतेही आहेत. फडणवीस यांच्या आजच्या भाषणाचे भाजपमध्ये असेच अनेक कौतुक होत आहे. त्यांचे भाषण संपल्यानंतर मंत्री सुरेश खाडे, मंत्री चंद्रकात पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आवर्जून भेट घेत कौतुक केले. पदाधिकाऱ्यांनीही भाषण संपताच उभे राहून दाद दिली.
लोकसभा निवडणुकीत दणका (Lok Sabha Election) बसल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर (Elections 2024) ठेवूनच भाजपने पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह प्रदेश भाजपमधील अनेक दिग्गज मंत्री, आमदार, खासदार, नेते, आजी, माजी आमदार, खासदार उपस्थित आहेत.
फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर, इकोसिस्टम तयार होतंय..; फडणवीसांची आरपारची लढाई
या अधिवेशनात बोलताना फडणवीस यांनी पहिल्या मिनिटापासूनच आक्रमकता कायम ठेवली होती. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आगपाखड केली. लोकसभेतील फेक नरेटिव्हवर भाष्य केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. या निवडणुकीत पाऊणे दोन कोटी मते घेणारच असा निर्धार व्यक्त केला.
फडणवीस यांच्या या भाषणात आक्रमकतेसह शेरो-शायरी होती, कविता होती. भविष्यात पदाधिकाऱ्यांनी कसे काम केले पाहिजे याबद्दलचे मार्गदर्शन होते. मुख्यमंत्री कोणाचा होणार, कोण होणार या खेळात न अडकता जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करण्याबद्दचा संदेश होता. याशिवाय अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेण्यावरुन कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीवरही त्यांनी भाष्य केले. काहींना हा निर्णय आवडला नाही, तर काहींना हा निर्णय आवडला. पण आपले ध्येय स्पष्ट असल्याने कधी तरी तह करावा लागतो, कधी तरी सलगी करावी लागते. पण त्यानंतरही आमचे काही चुकले असेल तर माफ करा, असा माफीनामाही होता.
फडणवीस यांच्या या आक्रमक भाषणानंतर आणि चौफेर बॅटिंगनंतर पदाधिकारी चार्ज झाले होते. भाषण संपताच सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उभे राहून त्यांच्या भाषणाला दाद दिली. त्यानंतर मंत्री सुरेश खाडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन आवर्जून कौतुक केले. व्यासपीठावर उपस्थित काहींनी दिलेल्या माहितीनुसार, “आजच्या भाषणानंतर तर आपण निवडणूक जिंकल्यातच जमा आहे, केवळ निकालाची देर आहे” अशा शब्दांत त्यांच्या भाषणाचे कौतुक केले. तर “त्यांच्या भाषणाने आम्ही लोकसभेतील पराभवाने आलेली सगळी मरगळ झटकून टाकली असल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
आता परवानगीची गरज नाही; मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश