Download App

Chitra Wagh : ‘त्या’ घटनेमागचे चेहरे गृहखातं समोर आणणारच; चित्रा वाघ यांचा इशारा

Chitra Wagh : पुणे विद्यापीठातील भिंतींवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून काल भाजप आणि डाव्या संघटनांत जोरदार राडा झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता भाजप महिला आघाडी प्रमुख चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पलटवार केला आहे. वाघ यांनी ट्विट करत सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ह्याच विद्येच्या माहेरघरात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजीविषयी निंदनीय मजकूर खरडणारी उलटी ‘मती’ कुणाची असेल हो मोठ्ठ्या ताई? आतापर्यंत शांत असलेलं विद्येचं माहेरघर कुणाच्या इशाऱ्यांनी अस्वस्थ होतंय, हे सगळ्यांना चांगलच माहिती आहे. राज्याचं गृह खातं या कृत्यांमागच्या करवित्यांचे चेहरे उजेडात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.. असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

सुप्रिया सुळेंचं ट्विट काय ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजपाप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या मुलांनी दुसऱ्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यानंतर विद्यापीठात आंदोलन करायला सुरुवात केली. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरात कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा पद्धतीने राजकारणाचे खेळ करण सत्ताधारी पक्षाला शोभत नाही. शैक्षणिक परिसराचे पावित्र्य आणि शांतता भंग करण्याचा अधिकार या लोकांना नाही. विद्यापीठात खेड्यापाड्यातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मारहाण करणारे गुंड विद्यापीठात घुसले कसे आणि त्यांनी कोणत्या अधिकाराने मुलांना मारहाण केली याची चौकशी होण्याची गरज आहे. गृहमंत्र्यांचे या गुंडगिरीला अभय आहे का याचाही खुलासा व्हायला हवा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण; पुणे विद्यापीठात दोन संघटनांमध्ये तुफान राडा

नेमकं काय घडलं होतं ?

विद्यापीठाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. या तक्ररीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पुणे शहर भाजपाने विद्यापीठ परिसरात आंदोलन केले. यावेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन गटांमध्ये बाचाबाची देखील झाली. यावेळी दोन्ही संघटना आमनेसामने आल्या होत्या. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना हा गोंधळ झाला. दोन गटांमध्ये बाचाबाची देखील झाली. विद्यापीठात JNU ची पुनरावृत्ती घडविण्याचे काम काही संघटना करत आहेत, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला.

follow us